|| शफी पठाण

उद्घाटनासाठी यंदा इतर भाषांतील  लेखकाचा विचारच नाही :- मराठी साहित्य संमेलन गुणात्मक दृष्टीनेही अखिल भारतीय व्हावे, यासाठी साहित्य महामंडळाने इतर भाषांतील प्रथितयश लेखकांच्या हस्ते संमेलनाच्या उद्घाटनाचा एक विधायक पायंडा मागच्या तीन वर्षांत पाडला होता. परंतु मागच्या वर्षी यवतमाळात झालेल्या संमेलनात नयनतारा सहगल यांच्या ‘निमंत्रण वापसी’वरून महामंडळाची बरीच अप्रतिष्ठा झाली. त्यातून अद्यापही न सावरलेल्या महामंडळाने यंदा उस्मानाबादेतील संमेलनाच्या उद्घाटनासाठी इतर भाषांमध्ये लिखाण करणाऱ्या लेखकाचा पर्यायच गुंडाळून ठेवला आहे.

Thane, ST, bogus certificate,
ठाणे : बोगस प्रमाणपत्राच्या आधारे एसटी महामंडळात नोकरी
shiv sena spent rs 70 thousand on sakhi mahotsav
शिवसेनेच्या सखी महोत्सवासाठी केवळ ७० हजार खर्च ? माहिती अधिकार कार्यकर्त्याची तक्रार
Political divisiveness, campaign material,
राजकीय फूट प्रचार साहित्य निर्मात्यांच्या पथ्यावर, मागणीत वाढ झाल्याने कारागिरांची रात्रंदिवस मेहनत
Supreme Court understanding of Ajit Pawar group regarding use of clock symbol
वृत्तपत्रात निवेदन ठसठशीत छापा! सर्वोच्च न्यायालयाची अजित पवार गटाला समज

महामंडळ नागपुरात असताना महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांच्या प्रयत्नातून तिन्ही वर्षांच्या संमेलनासाठी इतर भाषांमधील प्रतिभावंत लेखकांना उद्घाटनासाठी निमंत्रित करण्यात आले होते. या क्रमात डोंबिवलीत झालेल्या ९० व्या साहित्य संमेलनासाठी हिंदी-इंग्रजीचे प्रख्यात लेखक विष्णू खरे, बडोद्यात झालेल्या ९१व्या साहित्य संमेलनासाठी प्रसिद्ध गुजराती उपान्यासकार व ज्ञानपीठ पुरस्कार विजेते डॉ. रघुवीर चौधरी व मागच्या वर्षी यवतमाळात झालेल्या ९२ व्या साहित्य संमेलनासाठी इंग्रजीतल्या सिद्धहस्त लेखिका  नयनतारा सहगल यांना हा मान देण्यात आला होता. मराठी साहित्यातील चांगल्या गोष्टी प्रादेशिक चौकटीच्या पलीकडे पोहोचवता याव्या व इतर भाषांतील दर्जेदार साहित्यिकांची मराठीशी ओळख व्हावी, असा यामागचा हेतू होता. परंतु यवतमाळात  नयनतारा सहगल यांना दिलेले निमंत्रण ऐनवेळी मागे घेण्यात आले आणि त्यावरून महामंडळाला चौफेर टीकेचा मारा झेलावा लागला. या प्रकरणामुळे हादरलेले महामंडळ धाडसी निर्णयांसाठी ओळखले जाणाऱ्या कौतिकराव ठाले पाटलांच्या मराठवाडा साहित्य परिषदेकडे आल्यानंतरही सावरलेले नाही. उद्घाटकपदासाठी इतर भाषांमध्ये लिखाण करणाऱ्या साहित्यिकांच्या निवडीवरून पुन्हा वाद नको म्हणून महामंडळाने यंदा मराठी लेखकाच्याच हस्ते संमेलनाचे उद्घाटन करण्याचे ठरवल्याची माहिती आहे.

ना.धों. महानोरांना मान?

अद्भुत निसर्गकवितांनी, त्यातल्या रंग-गंधांनी, नदीच्या प्रवाहासारख्या नाद-लयींनी वाचक-रसिकांना वेड लावणाऱ्या व संमेलन होत असलेल्या मराठवाडय़ाशी एक वेगळा ऋणानुबंध असलेल्या ना.धों. महानोर यांना उस्मानाबादच्या संमेलनाचा मान दिला जाणार असल्याचे कळते. महामंडळ  मराठवाडवाडय़ात असल्याने संमेलनाध्यक्षही  मराठवाडय़ाचा असावा अशी एक भावना स्थानिक साहित्य वर्तुळात होती. त्यासाठी  मराठवाडापुत्रांची संभाव्य नावेही पुढे आली होती. परंतु संमेलनाध्यक्षपदी फादर दिब्रिटो यांची एकमताने निवड झाल्याने आता उद्घाटन तरी मराठवाडय़ाशी ऋणानुबंध असणाऱ्या साहित्यिकाच्या हस्ते व्हावे, यासाठी महानोरांच्या नावाला पसंती मिळाल्याची माहिती आहे.

उद्घाटकाचे नाव आयोजकांकडून अंतिम होणार आहे. ती प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती आहे. प्रथितयश लेखकाच्याच हस्ते संमेलनाचे उद्घाटन होईल, हे नक्की. –  कौतिकराव ठाले पाटील, अध्यक्ष, अ. भा. मराठी साहित्य महामंडळ.