शहरातील तलावांचे प्रदूषण रोखण्याकरिता नागपूर महापालिकेने चालवलेले प्रयत्न अपुरे पडल्याचे आता स्पष्ट झाले आहे. गणपती विसर्जनाच्या काळात तलावांच्या प्रदूषणाची पातळी वाढत असली तरीही वर्षभर ते कायमच असल्याने एकाही तलावातील पाणी पिण्यायोग्य राहिलेले नाही. सुमारे चार ते पाच वर्षांपूर्वी महापालिकेने ‘लेक रिज्युबिनेशन’ कार्यालयाकरिता कनिष्ठ उपअभियंता इस्राईल मोहंमद यांची नियुक्ती केली. मात्र, त्यानंतरही शहरातील तलावांची परिस्थिती कायम असण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
शहरात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा तलावातून नव्हे, तर पेंच नदीतून होतो, हे वास्तव असले तरीही पशुपक्ष्यांची तहान याच तलावांवर भागवली जाते. प्रामुख्याने तलावाच्या एकूणच स्थितीवर स्थलांतरित पक्ष्यांचे येणे अवलंबून असते. नागपूर आणि परिसरातील तलावांमध्ये गेल्या काही वर्षांत मात्र स्थलांतरित पक्ष्यांची संख्या बरीच कमी झाली आहे. मासेमारी हे एक कारण असले तरीही इतरही कारणांनी तलाव प्रदूषित झाले आहेत. त्यामुळेच महापालिकेने तलावांच्या सुधारणेकरिता असलेल्या ‘लेक रिज्युबिनेशन’ कार्यालयाकरिता इस्राईल मोहंमद यांची नियुक्ती केली. या नियुक्तीपासून चार ते पाच वर्षांचा काळ लोटला, पण विकास अहवाल तयार करण्याशिवाय कोणतीही ठोस कामगिरी पार पडली नाही. उलट, गणपती विसर्जनानंतर या तलावांच्या प्रदूषणाची पातळी आणखी खालावत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
तलावांपाठोपाठ नद्यांची अवस्थासुद्धा सारखीच आहे. शहरात पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत नाहीत. कधीकाळी शहराचे भूषण असलेल्या नागनदी व पिवळी नदी या नावातून अस्तित्व टिकवून आहे. शहरातील सांडपाणी वाहून नेणारी वाहिनी अतिशय जुनी असल्याने आणि लोकसंख्या वाढल्याने जुन्या झालेल्या या वाहिन्यांमधील घाण नदीत जात असल्यामुळे दोन्ही नद्यांचे रूपांतर नाल्यांमध्ये झालेले आहे. पाण्याच्या प्रदूषणाकरिता मूर्ती विसर्जन मोठय़ा प्रमाणावर कारणीभूत ठरत असले तरीही प्रदूषण पसरवणारे सांडपाणीसुद्धा तेवढेच कारणीभूत आहे. पाण्याचे प्रदूषण हा नागपूर शहराला भेडसावणारा सध्याचा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे जोपर्यंत मुर्ती विसर्जन प्रक्रिया बदलली जात नाही आणि सांडपाणी वाहून नेणारी वाहिनी वाढीव लोकसंख्येनुसार बदलवली जात नाही तोपर्यंत नागपूरकरांना ही समस्या भेडसावतच राहणार आहे.

निधीनुसार कामे सुरू -मोहंमद

यासंदर्भात ‘लेक रिज्युबिनेशन’ कार्यालयाचे इस्राईल मोहंमद यांना विचारले असता शासनाकडून येणाऱ्या निधीवर सर्व अवलंबून असल्याचे त्यांनी सांगितले. सोनेगाव तलावाचे काम १०० टक्के, पांढराबोडी तलावाचे काम ८० टक्के, तर गांधीसागर तलावाचे कामसुद्धा ४० टक्के पूर्ण झाल्याचे ते म्हणाले. निधीनुसार कामे सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.

.. तरीही पैशाची नासाडीच ठरेल
विशेष म्हणजे, गणोशोत्सवाच्या काळात दहाही दिवस होणाऱ्या मूर्ती विसर्जनामुळे प्रदूषणाची पातळी वाढते, हे लक्षात घेऊन अनेक स्वयंसेवी कृत्रिम तलाव तयार करतात. महापालिकेच्यावतीनेसुद्धा हा प्रयत्न होत असला तरीही तो तोकडा पडत आहे. अलीकडेच महापौर प्रवीण दटके यांनी १०० टक्के कृत्रिम तलावात मूर्ती विसर्जन करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. आता याच कार्यालयाअंतर्गत गांधीसागर तलावाच्या आत सुमारे पावणेदोन कोटी रुपये खर्चून कृत्रिम तलाव तयार करण्यात येत असल्याचे कळते. मात्र, कृत्रिम तलाव तलावाच्या आत नाही, तर बाजूला असतात. त्यामुळे केवळ गणेशोत्सातील दहा दिवसांच्या कालावधीकरिता तलावाच्या आत कृत्रिम तलाव तयार करण्यासाठी पावणेदोन कोटी रुपये खर्च करण्यात येत असतील तर ती पैशाची नासाडी ठरणार आहे.