हवालाची रक्कम असल्याचा संशय

पारडीहून प्रजापती चौकात आलेल्या एका कारमधून नंदनवन पोलिसांनी तीन कोटी १८ लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे. याप्रकरणी  दोघांना ताब्यात घेतले. ही रक्कम रायपूरहून (छत्तीसगड) एका सराफा व्यावसायिकाने नागपुरातील व्यवसायिकाकडे पाठवली होती. ही रक्कम हवालाची असल्याचा पोलिसांना संशय आहे.

छत्तीसगडमधील रायपूर येथून नागपुरात एमएच- ३१,  एफए- ४६११ क्रमांकाच्या कारमधून हवालाची कोटय़वधींची रोकड  येत असल्याची  माहिती  नंदनवन पोलिसांना मिळाली. त्यावरून शनिवारी निरीक्षक  सोनुले आणि सहाय्यक निरीक्षक सोनवणे  यांनी पारडी मार्गावरील प्रजापती चौकात रात्री दोन वाजताच्या सुमारास सापळा रचून कारला थांबवले. कारमध्ये राजेश वामनराव मेंढे (४०) रा. मिनीमातानगर, कळमना आणि नवनीत गुलाबचंद जैन (२९) रा. शांतीनगर, तुलसीनगर जैन मंदिराजवळ हे दोघे होते. आम्ही कारचे चालक आहोत आणि ही कार वर्धमाननगरातील प्रशांत केसानी नामक व्यापाऱ्याकडे घेऊन जात असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. पोलिसांनी केसानीला फोन लावून कारमध्ये काय आहे, अशी विचारणा करून त्याला नंदनवन पोलीस ठाण्यात येण्यास सांगितले. केसानीने याप्रसंगी पोलिसांशी बोलण्यास टाळाटाळ केली. खबऱ्याच्या माहितीवरून पोलिसांनी कारची तपासणी केली असता त्याच्या डिक्की आणि चारही सीटच्या पायदानाजवळ विशिष्ट कप्पे (लॉकर) तयार करण्यात आल्याचे दिसले. ते कुलूपबंद होते. त्याची चावी  केसानीकडे असल्याचे चालकाने सांगितले. केसानी प्रतिसाद देत नव्हता. नंतर त्याच्या वतीने मनीष खंडेलवाल पोलीस ठाण्यात आला. रविवारी सकाळी सात वाजता लॉकरची चावी उपलब्ध करून दिली. त्यात पोलिसांना दोन हजार, ५००, २०० आणि शंभरच्या नोटा होत्या. एकूण तीन कोटी १८ लाख ७ हजार २००  रुपये रोख  पोलिसांनी ती जप्त केली.

आयकर आणि ईडीकडे चौकशी

या प्रकरणाची चौकशी आयकर खाते व  अंमलबजावणी संचालनालयाला देण्यात आली. त्यानंतर दोन्ही खात्याच्या अधिकाऱ्यांनी  चौकशी सुरू केली आहे. चौकशीअंती ही रक्कम हवाला किंवा इतर कोणत्या व्यवसायाशी संबंधित आहे, हे स्पष्ट होणार आहे. दरम्यान, पोलिसांमध्येही काही वर्षांपूर्वी शहरात उघड झालेल्या डब्बा व्यवसायाशी संबंधित एका आरोपीची ही रक्कम असल्याची चर्चा होती.