राजकारणावर चर्चा हा खास भारतीयांच्या आवडीचा विषय. ती करणारा व्यक्ती कुठल्याही स्तरावरचा असू शकतो. थोडा निवांत वेळ मिळाला की दोन किंवा त्यापेक्षा जास्त लोकांमध्ये सुरू झालेला संवाद कधी राजकारणावर येईल हे सांगता येत नाही. इतका तो प्रत्येकाच्या सवयीचा भाग झालाय. रोज मजुरी करून पोट भरणारे गरीब लोक राजकारणावर चर्चा करत नाहीत हा भ्रम सुद्धा खोटा. त्यांनाही थोडी फुरसत मिळाली की चर्चेची गाडी महागाई, रोजगारावरून नकळत राजकारणावर येतेच. शहरातली उद्याने असोत, गावातला पार असो वा चावडी. चार लोक जमले की तावातावाने चर्चा होत असते ती याच विषयावर. हे चित्र सदासर्वकाळ दिसणारे. निवडणुका आल्या की त्याला आणखी बहर येतो. कुणातरी एका पक्षाची बाजू घेऊन त्वेषाने भांडणारे. वाद वाढतोय असे लक्षात येताच त्यात मध्यस्थी करणारे. आपल्याला काय त्याचे म्हणत चर्चेचा शेवट करणारे. मोदी अथवा राहुल आले काय? आपल्याला काय फरक पडतो असे म्हणणारे प्रत्येक ठिकाणी भेटतात. या चर्चेत कुणी नवखा सामील झालाच तर स्वत:ची मते दडवणारे. प्रसंगी शांत होणारे, कोणत्या बाजूचे हे कळू न देणारे लोकही असतात. सरकार वा राजकीय पक्षांविषयीची मते आडवळणाने मांडणे ही सुद्धा यापैकी अनेकांची खासियत. निवडणुकीच्या काळात याला उधाण येते. सध्या विदर्भात सर्वत्र याचाच जोर. त्यामागचे कारणही तसेच. या भागातला उन्हाळा तीव्र म्हणून आयोगाने येथील मतदान पहिल्या व दुसऱ्या फेरीतच घेतले. त्यामुळे मतदान व निकालातले अंतर वाढले. साधारण दीड महिन्याच्या या कालावधीत करायचे काय तर चर्चा. त्यामुळे सर्वत्र याचे फड रंगू लागलेत. त्यातला मुख्य विषय एकच. निवडून कोण येणार? सध्या ठिकठिकाणी याच प्रश्नावर काथ्याकूट सुरू.

निवडणुकीचे विश्लेषण, झालेल्या मतदानाचा निष्कर्ष, मतदारांचा कल हे तसे शास्त्रीय पद्धतीने हाताळले जाणारे विषय. त्यातही अचूकतेची हमी नाहीच. त्यामुळे ही पद्धत वापरून सुद्धा अंदाज चुकलेले. त्यावरून टीकेची झोडही उठते पण हे घडते ते अंदाजाच्या जाहीर करण्यावरून. समूहात होणाऱ्या चर्चेला यातले कोणतेही नियम लागू होत नाही. त्यामुळे या संवादाची गाडी सुसाट सुटते. जशी ती आता सुटलेली. यात हिरिरीने भाग घेणारे लोक तज्ज्ञ असल्याचा आव आणत आकडेवारी मांडतात. बरेचदा ती तटस्थ वृत्तीतून जन्मलेली नसतेच. ती मांडणाऱ्याचा राजकीय कल कुणाकडे व त्याची स्वत:ची इच्छा काय यावरून हे आकडे बदलत असतात. तरीही सारेजण ती लक्षपूर्वक ऐकतात. त्याचे एकमेव कारण म्हणजे निकालाला असलेला अवधी. आजकाल समाजमाध्यमावर कुणीही व्यक्त होऊ शकतो. त्यामुळे हे कथित तज्ज्ञ त्या भिंतीवर सुद्धा हे जय-पराजयाचे गणित बिनदिक्कतपणे मांडतात. मतदारसंघात एकूण जाती किती? त्यांची संख्या किती? त्यातल्या कोणत्या जातीने यावेळी कुणाला मतदान केले? कोणत्या धर्माची मते कुणाकडे वळली? उमेदवाराला जातीचा फायदा झाला की तोटा? उमेदवार अल्पसंख्य असेल तर त्याला पक्षाची म्हणून मिळणारी मते किती? कोणत्या पक्षाची मतपेढी किती? त्यात वाढ झाली की घट? कोणत्या विधानसभा क्षेत्रातून कुणाला किती मते मिळणार? कोणत्या समाजाचे मतदान कमी वा जास्त झाले? त्यातले किती टक्के कुणाकडे गेले? महिलांचा वर्ग कोणत्या बाजूने झुकला? कोणत्या समाज अथवा जातीच्या नाराजीचा फटका कुणाला बसला? ज्या क्षेत्रात जास्त वा कमी मतदान झाले तिथे नेमक्या कोणत्या जातींचा समूह राहतो? कुठला मुद्दा प्रचारात चालला व कुठला नाही? त्याचा मतदानावर परिणाम कसा झाला? कुणाच्या वक्तव्यामुळे किती मते खराब झाली? एखादा उमेदवार वा त्याचा नेता वादग्रस्त बोलला असेल तर मतदानावर त्याचा फरक काय पडला? कुठल्या भागातली किती टक्के मते कुणाच्या पारड्यात गेली? प्रचारात कमी पडल्यामुळे कुणाला किती फरक पडला? यासारख्या असंख्य प्रश्नांची उत्तरे सध्या विदर्भात सर्वत्र घडणाऱ्या चर्चेत छातीठोकपणे दिली जाताहेत. खरे तर हा अंदाजपंचेचाच प्रकार पण सामान्यांना या काळात तो आवडतो.

कुणी कशावर चर्चा करावी याचे कुठलेही कायदेशीर बंधन नसल्याने या चर्चासत्रांना सध्या ऊत आलेला. या उत्सुकतेत आणखी भर पडते ती सट्टाबाजाराची. त्यात कुणाचा भाव नेमका किती? सट्टा घेणारा कोण? त्याचे अंदाज नेहमी खरे ठरतात काय? यावरही प्रदीर्घ खल होतो. एवढेच काय पण उमेदवार सुद्धा त्यांच्या विश्वासूंकडून या बाजाराची माहिती घेत असतात. त्यात मागे पडतोय असे लक्षात येताच समर्थकांना समोर करून स्वत:ची स्थिती कशी भक्कम करता येईल यासाठी प्रयत्न करतात. याच काळात चर्चेत रस घेणारे सामान्य सुद्धा शर्यती लावतात. सध्या सर्वत्र अशा शर्यतींचा बोलबाला. अशा चर्चांमध्ये राजकीय पक्षाचा कार्यकर्ता वा स्थानिक नेता सहभागी झाला तर त्याच्या मताला मान असतो. म्हणजे त्याचे अंदाज गंभीरपणे ऐकले जातात. राजकारणाचे विश्लेषण करण्याची सवय अनेकांना असते. त्यांचीही मते ऐकली जातात. विजय किंवा पराभवाचे गणित कुणी कितीही तावातावाने मांडले तरी त्यावर प्रत्येक चर्चकाचा विश्वास बसेलच अशी स्थिती नसतेच. मग यातून वाद होतात व ते सामंजस्याने सोडवले सुद्धा जातात. या चर्चांची सुरुवात प्रामुख्याने स्थानिक पातळीवरून होते. म्हणजे त्यांच्या क्षेत्रात कोण जिंकणार यापासून. नंतर त्याचा लंबक हळूच राज्य व मग देशाकडे सरकतो. देशात कुणाची सत्ता येणार? कोणता नेता विजयी व पराभूत होणार याचे तपशीलवार विवेचन यावेळी केले जाते.

मतदारसंघातील चर्चा आटोपली की आजूबाजूच्या मतदारसंघात काय घडणार हे सांगणारे सुद्धा असतातच. ‘मी तिकडे जाऊन आलो अथवा माझे इतके नातेवाईक तिकडे राहतात. त्यांच्याशी बोलूनच ‘फर्स्ट हँड’ माहिती देतोय’ असे सांगणारे महाभाग प्रत्येक ठिकाणी असतातच. ही सारी मंडळी खोटे बोलतात अशातला भाग नाही. मात्र आता जे काही सांगतोय ते शंभर टक्के सत्य असाच त्यातल्या प्रत्येकाचा दावा असतो. हे सारे घडते ते मतदान व निकालात असलेल्या दीर्घ कालावधीमुळे. पूर्वी अशी संधी नसायची. तेव्हा फार तर दोन किंवा तीन टप्प्यात निवडणुका व्हायच्या. त्यामुळे चर्चांना फारसा वेळ मिळत नसे. आता नेत्यांना प्रचार करणे सोयीचे जावे, सत्ताधाऱ्यांना प्रत्येक टप्प्यातील मतदानाचा मूड ओळखता यावा म्हणून टप्पे वाढले. त्याचा फायदा लोकांना फावला वेळ चर्चेत घालवण्यासाठी मिळाला. त्यामुळे सध्या यात आवडीने सहभागी होणाऱ्या प्रत्येकाने सत्ताधारी व निवडणूक आयोगाचे आभार मानायला हवेत. निकाल काय लागेल ते लागू देत. पण सध्या सारे वैदर्भीय या चर्चेत रममाण झालेले. ऐन उन्हाळ्यात एवढा विरंगुळा तसाही महत्त्वाचाच.

devendra.gawande@expressindia.com