वाठोडा, म्हाळगीनगर, मानेवाडा चौक धोक्याची ठिकाणे

नागपुरात ३६ हून अधिक अपघात स्थळे आहेत. शहर विस्तारल्याने त्यात आणखी नवीन ठिकाणांची भर पडली. या स्थळांवर वारंवार अपघात का होतात, यामागे कोणती कारणे आहेत, याबाबत लोकसत्ता चमूने घेतलेला हा आढावा..

वाठोडा चौक, म्हाळगीनगर चौक आणि मानेवाडा चौक ही अपघातासाठी प्रसिद्ध ठिकाणे. या मार्गावर आतापर्यंत झालेल्या अपघातामुळे अनेक बळी गेले आहेत. अलीकडच्या काळात या मार्गावरील अपघातांची संख्या कमी झाली असली तरी बेशिस्त वाहतुकीमुळे अपघात होणारच नाही, याची खात्री देता येत नाही.

पूर्वी रिंग रोडवरून वाहने चालवणे धोक्याचेच होते. रिंग रोड अपघातांसाठी ओळखला जायचा. त्या रस्त्यावर घरातील कोणी जायला निघाले तर ‘जरा जपून’ अशी ताकीद दिली जायची. आजही या मार्गावर झालेल्या भीषण अपघातांची आठवण अनेकांना आहे.

‘असे अपघात पाहिले की मृतांच्या जवळ जाऊन पाहणे होत नव्हते’ अशा प्रतिक्रिया या भागातील नागरिक देतात. वाहतुकीचे नियम पाळले तर अपघाताला आमंत्रण मिळणारच नाही. मात्र, तसे होत नसल्यानेच अपघात होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

म्हाळगीनगर चौक, चामट चक्की चौक

गेल्या दहा वर्षांत अनेक अपघात पाहिलेले लोक म्हाळगीनगर चौकात भेटतात. वर्दळीचा चौक म्हणून तो प्रसिद्ध आहे. चारही बाजूंनी एकाच वेळी येणारी भरधाव वाहने धोक्याची ठरतात. वर्दळीच्या वेळी येथून वाहने काढताना थरकाप उडावा, अशी येथे स्थिती असते. चामट चक्की चौक म्हणजेच आताचा दिघोरी चौक. आता चौकातील अपघातांना चांगलीच खीळ बसली आहे. अपघात तेव्हाच होतात जेव्हा लोक सिग्नल तोडून बेशिस्तीने वाहन चालवतात, असे येथील नागरिकांना वाटते. थोडी ‘तू तू मै मै’ होते, पण ऑटोवाल्यांपेक्षा दुचाकीवाले नियमभंग जास्त करतात.

अपघात का होतात?

शाळा, रुग्णालय, दारू, मांसविक्रीच्या दुकानांसह चौकात मोठा बाजार भरतो. लोक आडवे तिडव्या गाडय़ा दामटत असतात. त्यामुळे येथे अपघात होण्याची शक्यता असते.

वाठोडा चौक

वाठोडा चौक असुविधांनी गजबजलेला आहे. सिग्नल नावालाच आहेत. एक सिग्नल दहा वर्षांपासून बंद आहे. त्यावरील दिवे कधी लागतच नाहीत. अलीकडेच कॅमेरेही लावले आहेत. अद्याप सुरू व्हायचे आहेत. चौकात चहाची, मोच्यांची, मेकॅनिक, पान टपरी, सुलभ शौचालय आहे. हॅलोजन लाईटस्चा भलामोठा खांब सिग्नलच्या मधोमध उभारण्यात आला आहे. मात्र, हा दिवाही बंदच असतो. बिनकामाचा सिग्नल आणि वाहतूक पोलीस कधी त्या चौकात उभा राहत नाही.

अपघात का होतात?

म्हाळगीनगरकडून पारडीकडे आणि विरुद्ध दिशेने जाणाऱ्या गाडय़ा वेगाने धावतात. तसेच जुन्या वाठोडय़ातून नवीन वाठोडय़ाकडे जाताना हाच चौक प्रमुख आहे. जवळच विश्वास शाळा, आदर्श स्कूल, महापालिकेची उच्च माध्यमिक शाळा आहे. मुलांची वर्दळ नेहमीच येथे असते.

‘या चौकात शाळेत जाणाऱ्या लहान मुलांचे अपघात बरेच झाले आहेत. कोणतीच सोय नाही की गतिरोधक देखील नाहीत. दिघोरी चौकातून पारडीकडे जाणारा रस्ता उताराचा आहे आणि वाहने सुसाट वेगाने धावत असतात. त्याचवेळी जुन्या वाठोडय़ातून नवीन वाठोडा भागात जाणाऱ्या लोकांचीही गर्दी असते. त्यामुळे अपघात होतात. गेल्या दहा वर्षांपासून एकदा सिग्नल लागला नाही की पोलीसही उभा राहिलेला नाही. कारण या सिग्नलवर उभे राहून पोलिसांना काय मिळणार?’

– शशिकांत पांडुरंगजी काळे, रहिवासी, वाठोडा

‘‘म्हाळगीनगर चौकात गेल्या १० वर्षांत भयानक अपघात पाहिले आहेत. प्रत्येकाला जाण्याची घाई. सिग्नल तोडून वाहने काढतात. सध्या अपघाताचे प्रमाण खूप नाही, पण लोकांमध्ये अद्याप शिस्त आलेली नाही. दुचाकीस्वार, सायकलस्वार केव्हा जवळून जातील आणि लोकांना पाडतील, याचा नेम नाही.’’

– नारायण पटले, दुकानदार, सूर्या सायकल, म्हाळगीनगर चौक