चंद्रपूर : सूर्यकांत खनके यांनी श्री संताजी सेवा मंडळ, बल्लारपूरचे अध्यक्ष अशोक झोडे व सचिव यशवंत बोंबले यांच्या खोट्या स्वाक्षऱ्या करून, तेली समाज जिल्हा चंद्रपूर, अशी नोंदणीकृत संघटना नसताना बनावट संस्था तयार करून काँग्रेस उमेदवार आमदार प्रतिभा धानोरकर यांना समस्त तेली समाजाचा पाठिंबा जाहीर केला. काँग्रेस उमेदवाराने रसद पुरविल्यानेच खनके यांनी हा खेळ खेळला. या प्रकरणाची निवडणूक आयोग व पोलीस तक्रार करणार असून राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे जातप्रमाणपत्र तपासा, अशी मागणी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभाचे उपाध्यक्ष तथा भाजप नेते प्रकाश देवतळे यांनी केली आहे.

येथील एन.डी. हॉटेलमध्ये आयोजित पत्रकारपरिषदेत देवतळे यांनी तेली समाजाने अजूनही कुठल्याही पक्षाला पाठिंबा दिला नसल्याचे सांगितले. पक्ष आणि समाज या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. समाजाच्या सर्व पदाधिकारी व व्यक्तीला विश्वासात घेऊनच आम्ही पाठिंबा देऊ. तेली समाजाच्या १२ संघटनांनी काँग्रेसला पाठिंबा दिल्याचे वडेट्टीवार माध्यमांना सांगत असेल तर ते खोटे बोलत आहेत. बहुसंख्य संघटनांनी पाठिंबा दिला नसल्याचे आम्हाला कळविले आहे. वडेट्टीवार स्वतः तेली नाहीत, त्यामुळे ते तेली समाजाचा पाठिंबा जाहीर करूच शकत नाहीत. वडेट्टीवार यांचे जातप्रमाणपत्र तपासावे, अशी मागणीही देवतळे यांनी केली.

हेही वाचा…नक्षलवाद्यांकडून निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचे आवाहन; “कोणत्याच पक्षाला समर्थन देऊ नका…”

वडेट्टीवार २० वर्षांत माझा उद्धार करू शकले नाही तर तेली समाजाचा उद्धार काय करणार. याउलट राज्याचे माजी अर्थमंत्री व विद्यमान वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तेली समाजाच्या सभागृहासाठी निधी दिला, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तेली समाजाला मोठा निधी दिला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही समाजासाठी निधी दिला. मात्र, काँग्रेस पक्षाने इतक्या वर्षात एक दमडीही दिली नाही. दिवं. खासदार बाळू धानोरकर यांनी खासदार निधीतून व आमदार प्रतिभा धानोरकर यांनी आमदार निधीतून एक रुपयाचा निधी दिला नाही. मग काँग्रेस पक्षाला पाठिंबा का म्हणून द्यायचा, असा प्रश्नही देवतळे यांनी यावेळी उपस्थित केला. काँग्रेसने तेली समाजाला निधी दिला नाही, मात्र तेली समाजाच्या नावावर खनके यांना रसद पुरविली असावी, असा आरोपही देवतळे यांनी केला.