देशभरात पीएच.डी.चे प्रमाण अत्यल्प; मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या पाहणीतील निष्कर्ष

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे दरवर्षी शिक्षणाची सद्य:स्थिती जाणून जगाच्या तुलनेत आपण कुठे आहोत, याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला जातो. त्यात उच्च शिक्षणातील सरासरी नोंदणी प्रमाण, देशातील संशोधन आणि त्याची पातळी, भारतीय संस्थांची जागतिक क्रमवारी, त्यातून निर्माण होणारे रोजगार, विद्यार्थी व शिक्षक प्रमाण, महिला व पुरुष शिक्षकांचे प्रमाण, त्यातील सर्वसमावेशकता इत्यादींचा तुलनात्मक अभ्यास दिसून येतो.

२०१४-१५मध्ये पदवीच्या प्रथम वर्षांच्या अभ्यासक्रमांसाठी ७९.४ टक्के विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील १ लाख १७ हजार ३०१ विद्यार्थ्यांनीच पीएच.डी.साठी नोंदणी केल्याचे दिसून येते. हे प्रमाण जेमतेम ०.३४ टक्के होते तर २०१५-१६मध्ये पदवीच्या प्रथम वर्षांला ७९.३ टक्के विद्यार्थ्यांची नोंदणी असताना केवळ १ लाख २६ हजार ४५१ विद्यार्थ्यांनी पीएच.डी.साठी नोंदणी केली. हे प्रमाण ०.४ टक्के एवढे अत्यल्प आहे.

आपल्याकडे संशोधन फारसे सकस नसते किंवा संशोधनापेक्षा नोकरी करून पॅकेज मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे हे नेहमीच वेगवेगळ्या व्यासपीठांवरून सांगितले जाते, त्याला ही आकडेवारी बळ देणारी आहे. आनंदाची बाब म्हणजे बारावीनंतर उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत महाराष्ट्र देशात आघाडीवर आहे. तब्बल ८ लाख ८० हजार २०२ विद्यार्थी महाराष्ट्रातील विविध विद्यापीठांमध्ये शिक्षण घेत आहेत. दुसऱ्या क्रमांकावर तामिळनाडू असून त्या ठिकाणी ७ लाख ६३ हजार ४०० विद्यार्थी आहेत. तिसऱ्या क्रमांकावर दिल्ली केंद्रशासित प्रदेश असून त्या ठिकाणी ७ लाख ३७ हजार ६९७ विद्यार्थ्यांची नोंदणी केल्याची नोंद केंद्र शासनाच्या अखिल भारतीय उच्च शिक्षण सर्वेक्षणात (एआयएसएचई) आली आहे.

देशातील किती विद्यार्थ्यांनी कोणत्या अभ्यासक्रमांसाठी नोंदणी केली हे पाहण्यासाठी केंद्र शासनाच्या संबंधित संस्थेने पीएच.डी., एम.फिल., पदव्युत्तर शिक्षण, पदवी शिक्षण, पदव्युत्तर पदविका, पदविका, प्रमाणपत्र आणि एकात्मिक अभ्यासक्रम असे आठ प्रकार केले. भारतात सर्वाधिक नोंदणी पदवीच्या प्रथम वर्षांला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची आहे. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्येही तसेच प्रमाण आहे. देशातील ३ कोटी ४५ लाख, ८४ हजार ७८१ विद्यार्थ्यांपैकी पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या २ कोटी ७४ लाख, २० हजार ४५० एवढी म्हणजे प्रमाण ७९.३ टक्के आहे. त्यानंतर ११.३ टक्के म्हणजे ३९.२ लाख विद्यार्थ्यांनी पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी नोंदणी केली आहे. पदविका अभ्यासक्रमासाठी नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ७.४ टक्के म्हणजे जवळपास २५.५ लाख आहे.

पदविका अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर बहुतेक विद्यार्थी शिक्षक प्रशिक्षण, नर्सिग किंवा तांत्रिक शाखांमध्ये प्रवेश घेतात. प्रमाणपत्र आणि पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी नोंदणीकर्त्यां विद्यार्थ्यांची संख्या अनुक्रमे १.४ आणि २.३ लाख आहे. त्यानंतर ५ हजार ७५३ विद्यार्थ्यांनी एकात्मिक पीएच.डी.साठी नोंदणी केली आहे. तर १ लाख २६ हजार ४५१ विद्यार्थ्यांनी पीएच.डी.साठी नोंदणी केली. म्हणजे पदवीला शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा आकडा कोटीच्या घरात असताना पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या २०१५-१६मध्ये जेमतेम ०.४ टक्के आहे.

राज्याच्या सार्वजनिक विद्यापीठांमध्ये पीएच.डी. करणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. दुसऱ्या बाजूला पदव्युत्तर पदवी पूर्ण झाल्यानंतर सामजिक विज्ञान व व्यवस्थापनाच्या विद्यार्थ्यांनी सर्वाधिक पीएच.डी.साठी नोंदणी केली आहे. यातील पीजी झाल्याबरोबर २२,१३२ विद्यार्थ्यांनी पीएच.डी.साठी नोंदणी केली हे विशेष. त्यात ६७.७ टक्के पुरुष आणि ३२.३ टक्के महिला आहेत. वाणिज्य शाखेत ३,४७१ विद्यार्थ्यांनी पीएच.डी.ची नोंदणी केली. महिला व पुरुषांमध्ये तुलना केल्यास कृषी, अभियांत्रिकी, शारीरिक शिक्षण या शाखांमध्ये महिलांचे पीएच.डी.चे प्रमाण अत्यल्प आहे. कृषी शाखेत एकूण ४८४९ विद्यार्थ्यांनी पीएच.डी. मिळवली आहे. त्यात कृषी, फलोत्पादन, वनीकरण आणि रेशीम उत्पादन अशा चार शाखा आहेत.

उच्च शिक्षण क्षेत्रातील पाहणी

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या वतीने २०१५-१६ मध्ये देशातील उच्च शिक्षणाच्या पाहणीत ७५४ विद्यापीठे, ३३ हजार ९०३ महाविद्यालये आणि ७,१५४ संस्थांची माहिती घेतल्यानंतर वरील पीएच.डी.धारकांची माहिती प्रसिद्ध केली. यामध्ये २६८ विद्यापीठांना महाविद्यालये संलग्नित आहेत. २७७ विद्यापीठे खाजगीरीत्या संचालित आहेत तर ३०७ विद्यापीठे ही ग्रामीण भागात आहेत. त्यात १४ विद्यापीठे केवळ महिलांसाठी आहेत. महिलांच्या विद्यापीठांपैकी ४ राजस्थानात आणि दोन तामिळनाडूत आहेत. तर आंध्र प्रदेश, आसाम, दिल्ली, हरयाणा, कर्नाटक, महाराष्ट्र, उत्तराखंड आणि पश्चिम बंगालमध्ये प्रत्येकी एक विद्यापीठ आहे.

देशात ४५९ सार्वजनिक विद्यापीठे

देशात ४५९ सार्वजनिक विद्यापीठे आहेत. १०१ तांत्रिक विद्यापीठे, ६४ कृषी व संबंधित अभ्यासक्रमाचे विद्यापीठे, ५० वैद्यकीय, २० विधि विद्यापीठे, ११ संस्कृत आणि ७ भाषा विद्यापीठे आहेत. यातील ८ राज्ये अशी आहेत की ज्यामध्ये सर्वाधिक महाविद्यालये आहेत. सर्वाधिक महाविद्यालये असणारे राज्य उत्तर प्रदेश असून त्या खालोखाल दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र आहे. त्यानंतर कर्नाटक, राजस्थान, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू आणि मध्य प्रदेशचा क्रमांक लागतो. एवढे असूनही केवळ १.७ टक्के महाविद्यालये पीएच.डी. कार्यक्रम राबवतात.

पीएच.डी. नोंदणीत विज्ञान शाखा आघाडीवर

विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांची सर्वाधिक पीएच.डी.साठी नोंदणी आहे. त्या पाठोपाठ अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. २०१५-१६ मध्ये एकूण २४,१७१ विद्यार्थ्यांना पीएच.डी.स्तरीय पदवी प्रदान करण्यात आली. त्यात १४,८८७ पुरुष आणि ९,२८४ महिला आहेत. सर्वाधिक ३३ टक्के पीएच.डी.धारक त्या त्या राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांतले आहेत. त्यानंतर राष्ट्रीय स्तरावरील संस्थांमध्ये २२ टक्के, केंद्रीय विद्यापीठांमध्ये ११ टक्के तर अभिमत विद्यापीठांमध्ये केवळ १२ टक्के लोकांनी पीएच.डी. केली आहे. राष्ट्रीय स्तरावरील संस्थांमध्ये पीएच.डी. करणाऱ्या महिलांची संख्या सर्वात कमी असून त्यानंतर राज्यातील खासगी मुक्त विद्यापीठे आणि अभिमत विद्यापीठांचा क्रमांक लागतो.