रेल्वे अपघातास मनुष्यबळाची कमतरता जबाबदार

रेल्वेच्या आकडेवारीनुसार देशात सुमारे २० टक्के ट्रॅकमनची पदे रिक्त आहेत

नागपूर-मुंबई दुरान्तो एक्स्प्रेसचे इंजिन आणि नऊ डबे मंगळवारी रुळावरून घसरले.

सातत्याने होत असलेले रेल्वे अपघात आणि गेल्याच आठवडय़ात नागपूर स्थानकावर टळलेला संपर्क क्रांती एक्स्प्रेसचा अपघात यासाठी रेल्वेतील सुरक्षिततेशी संबंधित खात्यात अपुरे मनुष्यबळ असणे हे प्रमुख कारण असल्याचे पुढे आले आहे.

गेल्या काही महिन्यात सातत्याने रेल्वे अपघात होत आहेत. नागपूर-मुंबई दुरान्तो एक्स्प्रेसचे इंजिन आणि नऊ डबे मंगळवारी रुळावरून घसरले. त्याला दरड कोसळणे हे कारण आहे, परंतु त्याआधी नागपूर स्थानकावरील २२ ऑगस्टला रुळ तुटण्याची घटना आणि संपर्क क्रांती एक्स्प्रेस अपघातातून बचावणे या घटना मानवी चुकांमुळे झाल्या आहे. नागपूर स्थानकावरील जुने रुळ बदलण्याचे काम सुरू आहे. फलाट क्रमांक १ वर जेथे रुळ तुटला, तो सुद्धा बदलण्यात येणार होता, परंतु अधिक धोकादायक असलेले रुळ आधी बदलण्यात येत होते. कारण अपुरे मनुष्यबळ आणि गाडय़ांच्या संख्येनुसार फलाट उपलब्ध नसणे हे होते. निर्धारित वेळापत्रकानुसार रुळ बदलण्यात आला असता तर २२ ऑगस्टची घटना टळली असती. मात्र, मनुष्यबळ नसल्याने ते काम पुढे ढकलण्यात आले होते.

रेल्वेच्या आकडेवारीनुसार देशात सुमारे २० टक्के ट्रॅकमनची पदे रिक्त आहेत. ट्रॅकमन रुळांचे निरीक्षण व दुरुस्ती करतात. रेल्वेला २,७१,२७२ ट्रॅकमनची आवश्यकता आहे. सध्या २,१७,७६४ एवढे कार्यरत आहेत. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात ट्रॅकमनची ५ हजार पदे मंजूर आहेत. त्यापैकी सुमारे ८५० पदे रिक्त आहेत. नागपूर विभागात १७ हजार मंजूर पदे आहेत, परंतु १४ हजार कर्मचारी सेवारत आहेत. म्हणजेच ३ हजार पदे रिक्त आहेत. सिग्नलिंग, ऑपरेटिंग आदी विभागात १० टक्के पदे रिक्त आहेत.

नागपूर विभागात गेल्या वर्षभरात सहा ठिकाणी रेल्वेला तडे गेल्याचे वेळीच लक्षात आले होते. दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेत मानवी चुकांमुळे अपघात होण्याची अनेकदा स्थिती निर्माण झाली होती. हे सर्व अपघात टळल्यामुळे त्यांची वाच्यता होत नाही. रेल्वेचे अधिकारी सांगतात, दर दोन दिवसांनी एक रेल्वे रुळांवरून घसरण्याची स्थिती निर्माण होते, परंतु यात मालगाडय़ांची संख्या अधिक असल्याने त्याची चर्चा होत नाही.

ट्रॅकमन आणि सुरक्षितता संबंधित खात्यातील कर्मचाऱ्यांची रिक्त पदे इतर विभागाच्या तुलनेत नागपूर विभागात कमी आहेत. ट्रॅकमनची १७ टक्के पदे आणि सुरक्षितता संबंधित खात्यातील केवळ १० टक्के पदे रिक्त आहेत. मनुष्यबळाची कमतरता हे एक कारण असले तरी अपघात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कारणाने होत असतात. दुरान्तो एक्स्प्रेस अपघात नैसर्गिक आपदामुळे झाला आहे.

– बृजेशकुमार गुप्ता, विभागीय व्यवस्थापक, मध्य रेल्वे, नागपूर.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नागपूर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Manpower shortages responsible for railway accidents

ताज्या बातम्या