गोरवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालयातील बचाव केंद्रात आणखी एका नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. हा पाहुणा अवघ्या दीड ते दोन महिन्याचा असून येताक्षणीच त्याने सर्वाना लळा लावला. आईपासून दुरावलेला असल्याने त्याची विशेष बडदास्त  ठेवली जात आहे.

वाघिणीपासून बछडे दुरावण्याचा प्रकार पुन्हा एकदा समोर येऊ लागला आहे. चंद्रपूर जिल्ह्यत नुकताच एका दोन महिन्याच्या बछडय़ाचा मृत्यू झाला होता. त्याच्या आईचा शोध घेण्याचा प्रयत्न अयशस्वी झाल्याने त्याला तेथील ‘ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटर’मध्ये ठेवण्यात आले होते. त्याला उपचाराकरिता येथील गोरेवाडा वन्यप्राणी बचाव केंद्रात आणण्याबाबत चर्चा सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला, तर पेंच व्याघ्र प्रकल्पात देखील वाघिणीचा बछडा मृत आढळून आला. ब्रम्हपुरी वनविभागातील परिक्षेत्र उत्तर ब्रम्हपुरी उपक्षेत्र मेंडकी नियतक्षेत्र चिचखेडा येथे २८ फेब्रुवारीला दुपारी दोन वाजताच्या सुमारास बिबटय़ाचे पिल्लू आढळून आले. मादी बिबटचा आसपास काहीच पत्ता नसल्याने या पिल्लासंदर्भात निर्णय घेण्याकरिता सात सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली. एक मार्चला समितीने या पिल्लाची पाहणी केली आणि दोन दिवस मादी बिबटय़ाची वाट पाहण्याचे ठरवले.

या दोन दिवसात मादी बिबटचा वावर त्या परिसरात आढळला नाही. त्यामुळे चंद्रपूर येथील ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटरमध्ये त्याला आणण्यात आले. त्या पिल्लाचे आरोग्य आणि पुढील व्यवस्थापनाच्यादृष्टीने गोरेवाडा वन्यप्राणी बचाव केंद्रात आणण्यासाठी चंद्रपूरच्या प्रादेशिक मुख्य वनसंरक्षकांनी प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) ए.के. मिश्रा यांना बिबटय़ाच्या पिल्लाला गोरेवाडय़ात आणण्याची परवानगी मागितली. डॉ. खोब्रागडे यांच्या सहकार्याने हे पिल्लू आज, मंगळवारी गोरेवाडय़ातील वन्यप्राणी बचाव केंद्रात आणले.

गोरेवाडय़ात त्याचा प्रवेश होताक्षणीच पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विनोद धूत यांनी त्याची जबाबदारी स्वीकारली. अवघ्या दीड ते दोन वर्षांच्या या पिल्लाचे आरोग्य उत्तम असून त्याने दूध देखील प्याले आहे. या नव्या आणि छोटय़ाशा पाहुण्याच्या आगमनाने गोरेवाडा प्रशासन देखील आनंदी आहे.