विषाणूच्या प्रादुर्भावाकडे दुर्लक्ष करून भेट घेतली

नागपूर :  करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विदेशातून आलेल्यांना  सक्तीने विलगीकरण कक्षात ठेवले जात असताना महापौर संदीप जोशी आज मंगळवारी मेडिकलमध्ये उपचार घेत असलेल्या करोनाग्रस्तांची चक्क वॉर्डातच भेट घेतली. त्यांच्या अशा कृतीने विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यास जबाबदार कोण, हा प्रश्न या भेटीतून उपस्थित झाला आहे.

करोनाचा विषाणू झपाटय़ाने पसरतो. हा आजार रोखण्यासाठी करोना बाधित रुग्णाच्या संपर्कात न येणे हाच उत्तम पर्याय आहे. के ंद्र व राज्यातील वरिष्ठ व कनिष्ठ मंत्र्यांकडूनही करोनाशी संबंधित वैद्यकीय व्यवस्थापन करणाऱ्या यंत्रणेवर ताण येऊ नये म्हणून रुग्णालयात जाणे टाळले जात आहे. अशा स्थितीत महापौर संदीप जोशी यांनी अधिष्ठाता कार्यालयात बसूनच बैठक घ्यायला हवी. परंतु आज त्यांनी मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह इतर अधिकाऱ्यांना सोबत घेऊन करोनाग्रस्त व संशयित रुग्णाच्या वार्डाला भेट  दिली. यावेळी त्यांच्यासोबत आणखी काही जण उपस्थित होते. या भेटीबाबत वैद्यकीय क्षेत्रातील जाणकारही आश्चर्य व्यक्त करत आहेत.

महापौर कार्यालयाचा बेजबाबदारपणा

संदीप जोशी यांच्या कार्यालयाने मंगळवारी सकाळी प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींना संदेश पाठवून महापौर मेडिकल, मेयोला भेट देणार असल्याचे सांगितले. करोनाग्रस्ताचे नाव व पत्ता नमूद करत त्यांच्या घरी भेट देत असल्याचे सांगून प्रसिद्धी माध्यमांनाही तेथे आमंत्रित के ले. रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची ओळख जाहीर होऊ नये यासाठी शासन आवाहन करीत असताना महापौर कार्यालयाच्या या कृतीने सर्वाना धक्का दिला. विशेष म्हणजे, अशा पद्धतीने रुग्णाचे नाव समोर येईल अशी कृती करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा शासनाने आधीच दिला आहे.

नागपुरातील करोनाचा जो रुग्ण आहे तो माझ्या प्रभागात राहतो. त्यांचा मला दूरध्वनी आला होता. यामुळे मी त्यांच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला. त्यांचा तपासणी अहवाल सकारात्मक आल्यापासून त्यांच्या घरी कुणीच जात नाही. म्हणून त्या कुटुंबाला दिलासा देण्याचा निर्णय घेतला. तसेच ‘मेयो’मध्येही मी शहराचा प्रथम नागरिक म्हणून गेलो होतो. याला प्रसिद्धी देण्याचा प्रकार चुकीचा आहे.

-संदीप जोशी, महापौर