बहुतांश जणांचा विदेशात प्रवास; रस्त्यांवरील गर्दी ओसरली

नागपूर:  मेडिकल आणि  मेयो येथे आज बुधवारी तब्बल अकरा संशयित करोनाग्रस्तांना दाखल करण्यात आले. त्यांच्या घशातील नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. यातील बहुतेकांनी विदेश प्रवास केला आहे.

शासनाच्या सूचनेवरून जिल्हा प्रशासनाने विदेशातून आलेल्या  प्रत्येक व्यक्तीची करोना चाचणी करून त्यांना १४ दिवस विलगीकरण कक्षात ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार विदेशातून आलेल्यांसह रुग्णाच्या संपर्कातील तब्बल ११ संशयित रुग्णांना नागपूरच्या मेडिकल, मेयोत दाखल करण्यात आले आहे.

मेडिकलमध्ये दाखल असलेल्या एक व्यक्ती अमेरिका, दुसरी इंग्लंड तर तिसरी फ्रांसमध्ये जाऊन आली आहे. मेयोतही बुधवारी आठ संशयित रुग्ण दाखल झाले. त्यातील बहुतांश रुग्णांचा विविध देशातून परतल्याचा इतिहास आहे. खबरदारी म्हणून त्यांचे नमुने तपासण्यासाठी मेयोत पाठवण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, बुधवारी शहरात २८ संशयितांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले. यापैकी दुपारच्या सत्रात मेयोच्या प्रयोगशाळेतील ८ नमुने नकारात्मक आले. इतर नमुन्यांची तपासणी सुरू होती. शहरात सध्या १५८ जण घरात किं वा इतर  विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असून त्यांच्यावर आरोग्य विभागाकडून लक्ष ठेवले जात आहे. त्यात विदेशातून प्रवेश केलेल्यांसह त्यांच्या संपर्कातील रुग्णाचाही समावेश आहे.  १४ दिवसांचा विलगीकरणाचा कालावधी पूर्ण झालेल्या ६ जणांना आज घरी पाठवण्यात आले, तर विमानतळावर आरोग्य विभागाकडून तब्बल ४७ जणांची स्क्रिनिंग करण्यात आली.