निवडणूक प्रतिज्ञापत्रातील पाच वर्षांची माहिती

नागपूर : भाजपचे उमेदवार व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री  नितीन गडकरी यांच्या उत्पन्नात २०१३-१४ च्या तुलनेत २०१७-१८ या आर्थिक वर्षांत (६,४०,७००) दीडपटीने तर काँग्रेसचे उमेदवार नाना पटोलेंचे उत्पन्न (५,६७,३७०) अडीच पटींनी वाढले आहे. त्यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात ही बाब नमूद आहे.

नितीन गडकरींचे २०१३-१४ या आर्थिक वर्षांत वैयक्तिक उत्पन्न २ लाख ६६ हजार ३९० रुपये होते. ते २०१४-१५ मध्ये ६ लाख १ हजार ४५०, २०१५-१६ मध्ये ८ लाख ७ हजार ३००, २०१६-१७ या वर्षांत ७ लाख ६५ हजार ७३० आणि २०१७-१८ मध्ये ६ लाख ४० हजार ७०० रुपये होते. नाना पटोले यांचे २०१३- १४ या आर्थिक वर्षांत एकूण उत्पन्न १ लाख ५३ हजार ५७३ रुपये होते. ते २०१४-१५ मध्ये ५ लाख ४० हजार ५६०, २०१५-१६ मध्ये ६ लाख ५९ हजार ८४४, २०१६-१७ या वर्षांत ८ लाख ३ हजार ६०३ आणि २०१७-१८ मध्ये ५ लाख ६७ हजार ३७० रुपये होते.

नितीन गडकरी यांच्या पत्नी कांचन गडकरी यांच्या उत्पन्नात सात पटींनी वाढ झाली आहे. कांचन गडकरी यांचे २०१३-१४ या वर्षांत ४ लाख ६९ हजार ३८० रुपये, २०१४-१५ या वर्षांत ५ लाख ३६ हजार ९० रुपये, २०१५-१६ मध्ये ४ लाख १ हजार ६५०, २०१६-१७ मध्ये ४ लाख ४१ हजार ३९० आणि २०१७-१८ मध्ये ३९ लाख ४२ हजार ३१० रुपये  होते. नाना

पटोले यांच्या पत्नी मंगला यांचे उत्पन्नातही वाढ  झाली आहे. २०१३-१४ मध्ये ३ लाख ६६७ रुपये, २०१४-१५ मध्ये ३ लाख ८९ हजार ८४९, २०१५-१६ मध्ये ३ लाख ९३ हजार २०३, २०१६-१७ मध्ये ४ लाख १४ हजार २२९, २०१७-१८ मध्ये ४ लाख ४० हजार २८७ रुपये होते.

पटोलेंपेक्षा गडकरी श्रीमंत

प्रतिज्ञापत्रानुसार गडकरी यांच्याकडे चल-अचल मिळून ७ कोटी ६५ लाख ३७ हजार १६ रुपयांची मालमत्ता आहे. त्यांच्यावर १ कोटी ५७ लाख २१ हजार ७५३ रुपयांचे कर्ज असून त्यांच्या पत्नी कंचन गडकरी यांच्याकडे ७ कोटी ३८ लाख ७९ हजार ४८५ रुपयांची चल-अचल संपत्ती आहे, तर ५ लाख ७ हजार २ रुपयांचे कर्ज आहे. तर नाना पटोले यांच्याकडे १ कोटी १८ लाख ३१ हजार २८४ रुपयांची चल-अचल संपत्ती असून त्यांच्या पत्नी मंगला यांच्याकडे ७२ लाख १३ हजार १५१ रुपयांची संपत्ती आहे.