लोकसत्ता टीम

नागपूर : गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गृहशहर असलेल्या नागपुरात हत्यासत्र सुरुच आहे. शनिवारी दुपारी दीड वाजता सदरमधील राजनगरात गोळ्या घालून एका माजी पत्रकाराचा भरदिवसा घरात घुसून खून करण्यात आला. गेल्या २४ दिवसांतील हे १४ वे हत्याकांड असून शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडल्याचे चित्र आहे. विनय पुणेकर असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या घटनेमुळे सदरमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

विनय पुणेकर यांनी काही वर्षांपूर्वी एका वृत्तपत्रात पत्रकार-छायाचित्रकार म्हणून काम केलेले आहे. सध्या ते दिनशॉ कंपनीशी जुळलेले होते. त्यांचे अनेक ठिकाणी पैशाचे व्यवहार होते. आर्थिक व्यवहारातून त्यांचे नेहमी वाद होत होते. शनिवारी दुपारी दीड वाजता पुणेकर हे राजनगर येथील घरी झोपलेले होते. एक युवक प्रवेशद्वार उघडून घरात घुसला. त्याने पुणेकर यांच्यावर गोळीबार केला आणि लगेच त्याने पळ काढला. काही वेळात पुणेकर यांची हत्या झाल्याची माहिती समोर आली. सदर पोलीस ठाण्याचे निरीक्षक आणि ताफा घटनास्थळावर पोहचला. त्यांनी घटनास्थळ पंचनामा करीत मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात दाखल केला. या प्रकरणी हत्याकांडाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा शोध सुरु आहे.

आणखी वाचा-‘‘लहान पक्ष संपवा, पदाधिकाऱ्यांना भाजपात आणा,” प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचे पदाधिकाऱ्यांना आवाहन

सीसीटीव्ही फुटेजवर आरोपीचा शोध

पुणेकर हत्याकांड उघडकीस आल्यानंतर सदर पोलिसांनी राजनगर येथील रस्त्यावरील आणि घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले. एका फुटेजमध्ये एक ३० ते ३५ वर्षीय युवक बॅग घेऊन घरात घुसताना आणि काही वेळातच घरातून बाहेर पडताना दिसत आहे. तोच आरोपी असल्याचे हेरून पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु केला आहे.