वर्धा : वर्धा हा गांधी जिल्हा की गावठी दारूचे माहेर, असा प्रश्न ठिकठिकाणी पाडणाऱ्या पोलिसांच्या धाडी व त्यात जप्त होणाऱ्या दारू साठ्यामुळे कुणासही पडावा. देशी विदेश दारूची अवैध वाहतूक करीत त्याची खुलेआम विक्री करण्याची बाब आता नित्याची ठरली आहे. तर थेट शिवारात गावठी दारूने उच्छाद मांडल्याचे चित्र आहे. मात्र आता ही दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य जीवावर बेतणारे ठरू शकते, असे उघडकीस आले आहे. अस्सल मोहाफूलची दारू किक देत नाही म्हणून वेगवेगळ्या पद्धतीने झटकेबाज दारू करणारी फॅक्टरीच उजेडात आली.

शहरालगत गणेशपूर, पांढरकवडा येथील पारधी बेड्यावर हा प्रकार उघडकीस आला. रेशिंदा उर्फ चंपी सखाराम फुलमाळी तसेच इंद्रपाल उर्फ इंद्रधनू राजू भोसले यांनी गावठी दारू निर्मितीचा कारखानाच उघडला होता. तशी माहिती मिळाल्यावर सावंगी पोलिसांनी धाड टाकली. त्यावेळी काही प्रमाणात मोहाफूल व उर्वरित बेशरमच्या झाडाचा विषारी पाला, बॅटरीच्या निकामी सेलमधील काळा भुरका, युरिया तसेच गूळ टाकून हा जिन्नस सडविला जात होता. नंतर तो मोठ्या ड्रम मध्ये उकळल्या जात असे. या दारूची नशा अधिक किक देणारी असल्याचे सांगण्यात आले. पोलिसांनी हे सर्व साहित्य तसेच दारू नष्ट केली. या ठिकाणी सापडलेला एकूण ८७ हजार रुपये किमतीचे साहित्य जप्त करण्यात आले. या प्रकारच्या दारूने जिल्ह्यात बळी जाण्याच्या पूर्वी अनेक घटना घडल्या आहेत.

हेही वाचा…चिंता वाढली; अमरावती विभागातील धरणांमध्‍ये ५१ टक्‍के पाणीसाठा

दोनच दिवसापूर्वी नांदोरा शिवारात गावठी दारू जप्त करीत अमोल सुनील तुराणकर व अभिलाष डफरे यांना अटक करण्यात आली होती. करोना काळात बाहेरून येणारी देशी विदेशी दारू विकणे ठप्प पडले होते. तेव्हा ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात गावठी दारू तयार करणारे अड्डे सूरू झाले होते. जंगलात आडवळणावर अशी दारू तयार केली जात होती. ते बंद करतांना पोलिसांच्या नाकी नऊ आले होते. करोना संक्रमण संपल्यावर परत बाहेरून दारू येणे सूरू झाले. त्यामुळे गावठी दारूचे अड्डे रोडावले. अजूनही ते सुरूच असल्याचे चित्र पुढे आले आहे.