युवक काँग्रेसच्या तोडफोडीमागचे कारण

जनतेच्या प्रश्नांवरून महापालिकेतील भाजप सत्ताधाऱ्यांविरोधात आक्रमक भूमिका घेण्याऐवजी त्यांच्याशी सलगी ठेवण्याच्या धोरणामुळे महापालिकेतील विरोधी पक्षनेते व काँग्रेसचे गटनेते तानाजी वनवे यांच्यावर युवक काँग्रेसचे कार्यकर्त्यांचा राग आहे. त्यातूनच दोन दिवसांपूर्वी त्यांच्या कक्षाची तोडफोड झाल्याची माहिती पुढे आली आहे.

युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक व महापालिकेतील विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांच्या कक्षात तोडफोड केली. या घटनेमागे काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी कारणीभूत असल्याचे सांगितले जाते. मात्र युवक काँग्रेसला हे पाऊल उचलण्यासाठी वनवे यांची सत्ताधाऱ्यांशी असलेली सलगी हे सुद्धा एक प्रमुख कारण आहे, असे युवक काँग्रेसचे कार्यकर्ते सांगू लागले आहेत.

सलग पंधरा वर्षे पक्ष सत्तेत नसल्याने शहरात युवक काँग्रेस सुस्तावलेली होती. मात्र पाच वर्षांत या संघटनेचा विस्तार झाला आहे. समाजातील सर्व घटकांमधील युवक आता संघटनेच्या झेंडय़ाखाली काम करीत असल्याचे गेल्या काही वर्षांतील नागपुरातील चित्र आहे. शहरातील विविध समस्यांवरून त्यांनी कधी महापालिका प्रशासनाविरुद्ध तर कधी राज्य सरकार विरोधात आंदोलन केले आहे. अशाच आंदोलनातून काँग्रेस नेते बंटी शेळके यांचे नेतृत्व पुढे आले आहे. शेळके यांच्या प्रमाणेच आंदोलनाच्या माध्यमातून राजकारणात स्वत:चे स्थान निर्माण करू पाहणाऱ्या अनेक तरुणांचा समावेश सध्या युवक काँग्रेसमध्ये आहे. महापालिकेतील पक्षाच्या गट नेत्यानेही शहरातील विविध समस्यांच्या मुद्यांवरून तेथील सत्ताधाऱ्यांना जेरीस आणावे, अशी या संघटनेची अपेक्षा आहे. मात्र वनवे यांचे धोरण सुरुवातीपासून सत्ताधाऱ्यांशी जुळवून घेणारे राहिले आहे. त्यामुळे एक सक्षम विरोधी पक्षनेता म्हणून त्यांना त्यांच्या कामाचा अद्याप ठसा उमटवता आला नाही. परिणामी महापालिकेत काँग्रेस निष्प्रभ झाल्याचे चित्र आहे.

एकीकडे युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आंदोलन करीत असताना दुसरीकडे विरोधीपक्षनेते हातावर हात देऊन बसल्याचे चित्र निर्माण झाल्याचा राग युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या मनात आहे. यातूनच वनवे यांच्या कक्षाची तोडफोड झाल्याचे युवक काँग्रेसचे नेते सांगतात.

पहिल्यांदाच निवडून आलेले काँग्रेसचे नगरसेवक देखील विरोधीपक्ष नेत्यांवर नाराज आहेत. महापालिका आयुक्त आणि स्थायी समितीकडून विकासकामांच्या फाईल मंजूर करण्यासाठी विरोधीपक्ष नेत्याने पदाचा वापर करणे अपेक्षित आहे. तसे काहीच होताना दिसत नाही आणि आणखी अडीच वर्षांनी निवडणुकीला सामोरे जाताना लोकांना उत्तरे द्यायची कशी असा प्रश्न या नवख्या नगरसेवकांना पडला आहे.

कक्षातील तोडफोड हा वाईट प्रकार आहे. संतप्त कार्यकर्त्यांचा कक्ष पेटवण्याचा प्रयत्न होता. पण तेथे काही नगरसेवक आणि कर्मचारी असल्याने तो प्रकार टळला. मध्य नागपूर विधानसभा निवडणुकीशी  माझा थेट संबंध नाही. त्यामुळे कुठल्या कारणांसाठी ही तोडफोड करण्यात आली याचे कारण कळू शकले नाही. – तानाजी वनवे, विरोधीपक्ष नेते, महापालिका.

या प्रकरणाशी माझा काही संबंध नाही. तानाजी वनवे यांना विरोधी पक्षनेता होता यावे म्हणून मी त्यांच्या समर्थनार्थ चार नगरसेवकांचे बळ दिले होते. युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये त्यांच्याविषयी नाराजी असेल, ती त्यांनी व्यक्त केली असावी. – बंटी शेळके, नगरसेवक काँग्रेस