अमरावती : अमरावती लोकसभा मतदार संघातील प्रहार जनशक्‍ती पक्षाचे उमेदवार दिनेश बुब यांच्‍या प्रचारार्थ आयोजित सभेसाठी येथील सायन्‍सकोर मैदानाचे २३ आणि २४ एप्रिल रोजीचे आरक्षण अखेर जिल्‍हा परिषदेने रद्द केले असून गृहमंत्री अमित शाह यांच्‍या सुरक्षेच्‍या दृष्‍टीने हे मैदान तयार करण्‍यात आले असून आता दुसरीकडे, एका दिवसात तयारी करणे शक्‍य नाही, हे कारण त्‍यासाठी देण्‍यात आले आहे.

दरम्‍यान, सायन्‍सकोर मैदानावर आमदार बच्‍चू कडू यांचे ठिय्या आंदोलन सुरूच आहे. दिनेश बुब यांच्‍या प्रचारासाठी २३ आणि २४ एप्रिल रोजी सायन्‍सकोर मैदान उपलब्‍ध करून देण्‍यात येत असल्‍याचे पत्र जिल्‍हा परिषदेच्‍या शिक्षणाधिकाऱ्यांनी १८ एप्रिल रोजी दिले होते. दुसरीकडे, गृहमंत्री अमित शाह यांच्‍या सभेसाठी २२ एप्रिल रोजी मैदानाची परवानगी देण्‍यात आली होती. पण, काही कारणांमुळे अमित शाह यांची सभा पुढे ढकलण्‍यात आली आणि ही सभा २४ एप्रिल रोजी आयोजित करण्‍यात आली.

हेही वाचा >>> ‘‘तोंडात भवानी, पोटात बेईमानी…” मुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका; म्हणाले, “बाप एक नंबरी, तो बेटा…”

यादरम्‍यान, भाजपतर्फे नवीन परवानगी न घेतात, मैदानावर मंडप उभारणी सुरू केली. त्‍यावर प्रहार जनशक्‍ती पक्षाने आक्षेप घेतला. अमरावती लोकसभा मतदार संघाचे सामान्‍य निरीक्षक सी.जी. रजनीकांथन यांनी जिल्‍हाधिकारी आणि निवडणूक‍ निर्णय अधिकारी सौरभ कटियार यांना २२ एप्रिल रोजी पत्र पाठवून सायन्‍सकोर मैदान हे दिनेश बुब यांना उपलब्‍ध करून देण्‍यात यावे, अन्‍य कुणाला मंडप उभारण्‍याची परवानगी देण्‍यात येऊ नये, अशी सूचना केली होती.

हेही वाचा >>> “संविधान बदलणार नाही,” अमित शाह यांचा पुनरुच्चार; म्हणाले, “एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण”

एकीकडे, सायन्‍सकोर मैदान सभेसाठी वापरण्‍याची रीतसर परवानगी, शुल्‍क भरल्‍याची पावती, निवडणूक निरीक्षकांचे पत्र सोबत असतानाही बच्‍चू कडू यांना मैदानावर प्रवेश रोखण्‍यात आला. सुरक्षेच्‍या कारणावरून हे मैदान प्रहार जनशक्‍ती पक्षाला देणे शक्‍य होणार नाही, असे पोलीस प्रशासनाकडून सांगण्‍यात आले. त्‍यामुळे पोलीस अधिकारी आणि बच्‍चू कडू यांच्‍यात चांगलाच वाद झाला. भाजपला मैदान वापरण्‍याची परवानगी कशी मिळाली, परवानगीचे पत्र द्या, असे आव्‍हान बच्‍चू कडू यांनी देत ठिय्या आंदोलन सुरू केले.

दरम्‍यान, सायंकाळी उशिरा जिल्‍हा परिषदेच्‍या शिक्षणाधिकाऱ्यांनी प्रहार जनशक्‍ती पक्षाच्‍या प्रचारासाठी सायन्‍सकोर मैदानाची परवानगी रद्द करण्‍यात आल्‍याचे पत्र जारी केले. प्रहार जनशक्‍ती पक्षाच्‍या प्रचारासाठी आपल्‍याकडील उपलब्‍ध दुसरे सोयीस्‍कर मैदान देण्‍यात यावे, अशी शिफारस पोलीस आयुक्‍तांनी पत्राद्वारे केली. यासंदर्भात शिक्षणाधिकाऱ्यांनी नोडल अधिकाऱ्यांना एक पत्र पाठविले. अवघ्‍या काही तासांत या वेगवान घडामोडी घडल्‍या. पण, यामुळे बच्‍चू कडू यांचे समाधान झालेले नाही. त्‍यांचे आंदोलन सुरूच आहे.