लोकसत्‍ता टीम

अमरावती : बलात्कार प्रकरणी येथील मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या एका कैद्याने पोलिसांच्‍या हातावर तुरी देऊन पलायन केल्‍याने खळबळ उडाली आहे. या कैद्यावर इर्विनमधील कैदी वॉर्डात उपचार सुरू होते. त्‍याच्‍यावर लक्ष ठेवण्यासाठी वॉर्डबाहेर चार पोलिसांना तैनात करण्‍यात आले होते. मात्र, या कैद्याने पोलिसाच्या उशीखाली ठेवलेली चावी काढून वॉर्डचे कुलूप उघडले आणि पलायन केले. ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. शहर पोलीस पसार कैद्याचा शोध घेत आहे.

विलास नारायण तायडे (४२, रा. सुंबा, ता. संग्रामपूर, बुलडाणा) असे पसार झालेल्या कैद्याचे नाव आहे. विलास तायडे याच्याविरुध्द अकोला जिल्ह्यातील हिवरखेड पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. याच प्रकरणात अकोला येथील अतिरीक्त सत्र न्यायालयाने १३ ऑक्टोंबर २०२१ रोजी त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर १ नोव्हेंबर २०२१ रोजी त्याला अमरावती मध्यवर्ती कारागृहात दाखल करण्यात आले होते. त्यावेळीपासून तो अमरावती कारागृहात शिक्षा भोगत होता. गेल्‍या २८ एप्रिल २०२४ रोजी विलास तायडेला कारागृहातच डोक्याला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला उपचारासाठी येथील जिल्‍हा सामान्‍य रुग्‍णालयात दाखल करण्यात आले होते.

आणखी वाचा-शिंदे, फडणवीस विरुद्ध केदार, रामटेकचा निकाल ठरवणार कोण भारी ?

कैदी वॉर्डमध्ये त्याच्यावर उपचार सुरू होते. या वॉर्डमध्ये कैदी असल्यास एक जमादार आणि तीन पोलीस शिपाई असे चार अंमलदार तैनात असतात. ३० एप्रिललासुध्दा चार पोलीस तैनात होते. दरम्यान पहाटे चार वाजताच्या सुमारास वॉर्डबाहेर तैनात असलेल्या पोलिसाच्या उशीखाली असलेली वॉर्डच्या कुलूपाची चावी काढली व कुलूप उघडून पोबारा केला. ही बाब तैनातीला असलेल्या पोलिसाला कैदी पळून गेल्यानंतर लक्षात आली. पोलिसांनी शोधाशोध केली मात्र तो सापडला नाही. अखेर ही माहीती कोतवाली, नियंत्रण कक्षाला देण्यात आली. त्यानंतर कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल करुन त्याच्या शोधासाठी पथक रवाना केले आहे.