नागपूर : शहरातील खासगी, सरकारी आणि निमसरकारी कार्यालयांसह इतरही ठिकाणी काम करणाऱ्या खासगी सुरक्षा रक्षकांना त्यांच्या कामाचा योग्य मोबदला मिळत नसून अनेक ठिकाणी तर त्यांना साप्ताहिक सुट्टी नाकारली जाते. यामुळे सुरक्षा रक्षकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे.

शहरात विविध खासगी सुरक्षारक्षक संस्थांकडे हजारो सुरक्षारक्षक काम करतात. यात तरुणांसह साठी ओलांडलेल्या ज्येष्ठ नागरिकांचाही समावेश आहे. त्यांना विविध कंपन्या, कारखाने, दवाखाने, खासगी, सरकारी, निमसरकारी कार्यलये, निवासी इमारती, दुकाने आणि बार-रेस्टॉरन्टसह इतर ठिकाणी तैनात केले जाते. कामावर रुजू होताना त्यांना चांगल्या मोबदल्याचे आमिष दिले जाते. परंतु हाती तुटपुंजी रक्कम ठेवली जाते.

control blood sugar
रक्तशर्करेच्या नियंत्रणासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश
balmaifal article, story for kids, water literacy, Water importance, do not waste water lesson, story cum lesson for water, save water, kids and water, marathi article, loksatta article,
बालमैफल : जलसाक्षरता
china people punished for not paying debt
जीवनावश्यक वस्तू खरेदी करणेही कठीण; कर्ज फेडू न शकणाऱ्यांना चीन कशी शिक्षा करत आहे?
printed receipts toxic body experts stop you must not touch those printed receipts heres why
खरेदीनंतर मिळणाऱ्या पावतीला स्पर्श करणे आरोग्यासाठी ठरतेय घातक? डॉक्टर काय सांगतात? वाचा

 विशेष म्हणजे, या संस्थांना संबंधित आस्थापनांकडून महिन्याला २० ते २५ हजार रुपये मिळतात. त्या प्रमाणात सुरक्षा रक्षकांना मोबदला मिळणे अपेक्षित असते, पण तसे होत नाही, असे काही सुरक्षा रक्षकांनी सांगितले. अनेकदा बदली कर्मचारी न आल्यामुळे २४ तास काम करावे लागते. कामाच्या ठिकाणी आजारी पडल्यास तत्काळ वैद्यकीय मदत मिळत नाही. सण-उत्सवाची सुट्टी तर नसतेच, अनेकदा साप्ताहिक सुट्टय़ाही दिल्या जात नाहीत. याशिवाय, अतिरिक्त मोबदलाही मिळत नसल्याची व्यथा सुरक्षा रक्षकांची आहे.

भरती प्रक्रिया अशी..

सुरक्षा रक्षकांच्या भरतीसाठी संस्थाचालकांकडून एक प्रक्रिया राबवली जाते. इच्छुकांना त्यांच्या कार्यालयात अर्ज करावा लागतो. निवड झाल्यावर कामाचे स्वरूप आणि मोबदल्याबाबत माहिती दिली जाते. अटी मान्य करणाऱ्यांची नोंदणी केली जाते. संस्थांकडे सुरक्षा रक्षकाची मागणी आल्यावर नोंदणी करणाऱ्यांना तेथे तैनात केले जाते.

आरोग्य तपासणी नाही

सुरक्षा रक्षकाची नोंदणी करताना त्यांची आरोग्य तपासणी केली जात नाही. शारीरिक तंदुरुस्तीकडेही दुर्लक्ष केले जाते. त्याच्याकडून आधारकार्ड किंवा अन्य कोणताही पुरावासुद्धा संस्था घेत नाही. या संस्थांनी सुरक्षा रक्षकाची नोंदणी करताना नियमाप्रमाणे त्याची पूर्ण माहिती घेणे आवश्यक आहे. पोलिसांचे ना-हरकत प्रमाणपत्रही गरजेचे आहे. त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असेल तर त्याला नियुक्त करता येत नाही, मात्र, याकडे सर्रास दुर्लक्ष केले जात असल्याचे निदर्शनास येते.

सुविधा कागदोपत्रीच

सुरक्षा रक्षकांना शासनाच्या नियमानुसार आरोग्य विमा, भविष्य निर्वाह निधी, आरोग्याच्या इतरही सुविधा आणि किमान वेतन देणे बंधनकारक असते. प्रत्यक्षात काही संस्थांचा अपवाद वगळता बहुतांश संस्तांतील सुरक्षा रक्षकांना या सुविधा फक्त कागदोपत्री पुरवल्या जात असल्याचा आरोप आहे.

वेतनात वारंवार कपात

कंपनीकडून एका सुरक्षा रक्षकासाठी १८ ते २२ हजार रुपये दिले जाते. परंतु सुरक्षा रक्षकाच्या हातात प्रत्यक्षात ८ ते १० हजार रुपयेच येतात. अतिरिक्त कामाचा मोबदलाही त्यांना दिला जात नाही. दुसरीकडे, कामावर येण्यास काही मिनिटे उशीर झाल्यास थेट दिवसाचे निम्मे वेतन कपात केले जाते. कर्तव्यावर असताना झोप लागल्यास २०० ते ५०० रुपयांचा दंडही आकारला जातो, असे सुरक्षा रक्षकांनी त्यांचे नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितले.

सुरक्षा रक्षकांचा घरकामांसाठी वापर

कर्तव्याच्या ठिकाणी सुरक्षारक्षकांना घरातील कामे, पाळीव प्राण्यांची निगा राखणे, किराणा दुकानात पाठवणे, अशी खासगी कामे सांगितली जातात. ते करण्यास नकार देणाऱ्यांना कामावरून काढले जाते किंवा त्यांची इतर ठिकाणी रवानगी केली जाते, अशाही तक्रारी सुरक्षारक्षकांनी नोंदवल्या.

३० टक्के सुरक्षा रक्षक वृद्ध

सुरक्षारक्षकांची भरती करताना वयाबाबत निकष पाळले जात नसल्याचे निदर्शनास येते. शहरात सर्वत्र असेच चित्र आहे. सरासरी ३० टक्के सुरक्षारक्षक साठी ओलांडलेले आहेत. त्यांना सुरक्षा विषयक प्रशिक्षण दिले जात नाही. त्यामुळे अनेकदा सुरक्षा रक्षकांचीच रक्षा करण्याची वेळ आस्थापनांवर येते, असे चित्र आहे.

शिक्षित असूनही काम मिळाले नसल्याने सुरक्षारक्षक म्हणून नोकरी स्वीकारली. संस्थेकडून अल्प मोबदला मिळायचा. कोणतेही ठोस कारण न देता वेतन कपात केली जायची. विचारणा केली तर कामावरून काढण्याची धमकी दिली जायची. या त्रासाला कंटाळून कंटाळून काम सोडले.

पी.बी. मांगुळकर, काम सोडलेले सुरक्षा रक्षक