छत्तीसगडचे मुख्यमंत्री बघेल यांचा सवाल

पुलवामा हल्ल्याच्या चौकशीचे काय झाले, तेथे आरडीक्स कसे आले, असा सवाल छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी उपस्थित केला. निवडणूक प्रचारासाठी नागपुरात आले असता ते प्रेस क्लब येथे पत्रकारांशी बोलत होते.

बघेल म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अनुच्छेद ३७० चे ढोल वाजवत आहे. मात्र, ज्या हल्ल्यात जवान शहीद झाले त्याच्या चौकशीबद्दल बोलत नाही. या घटनेस जबाबदार कोण, येथे २५० किलो आरडीएक्स आले कुठून, हे त्यांनी देशाला सांगायला पाहिजे. जनसंघापासून अनुच्छेद ३७० काढून टाकण्याबद्दल ते बोलत होते. ते त्यांनी केले. परंतु एखाद्या राज्याची सहमती न घेता, त्या राज्याचे दोन तुकडे करून एक भाग केंद्र शासीत करणे कितपत योग्य आहे? असे आजवर कधी झाले नाही. अशाप्रकारे सहमती न घेता कोणत्याही राज्याला केंद्र शासित करण्याचा पायंडा पडण्याची भीती आहे. वटहुकूम काढून महाराष्ट्राची विधानसभा भंग केली आणि केंद्र शासित प्रदेश म्हणून घोषित केल्यास येथील जनतेला ते मान्य होईल काय, असा सवालही त्यांनी केला.

मोदी यांनी महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त पदयात्रा काढण्यास सांगितले. भाजपने गांधीला स्वीकारले, ही चांगली गोष्ट आहे. परंतु ते गांधी यांचा खुनी गोडसेचा निषेध करतील का? गांधी यांचा राष्ट्रवाद भारतीय परंपरेतून आला आहे तर भाजप, संघाच्या राष्ट्रवादावर हिटलर आणि मुसोलिनी प्रभाव दिसतो. त्यामुळे त्यांच्या विचारसरणीत असहमतीसाठी जागा नाही. त्यामुळे ते त्यांच्या विचाराशी असहमत असलेल्यांना देशद्रोह्य़ांचे प्रमाणपत्र वाटत असतात. संघाच्या लोकांची भारतीय स्वातंत्र्य लढय़ातील भूमिका सर्वाना ठाऊक आहे.परंतु गांधी किंवा काँग्रेसजणांनी कधी संघाच्या लोकांना देशद्रोही म्हटले नाही, अशी टीका बघेल यांनी केली.

ते म्हणाले, छत्तीसगडमधये काँग्रेसचे सरकार आल्यावर बडे नक्षली एकतर पकडले गेले, मारले गेले किंवा शरण आले.  राज्यात  नक्षलवादी आहेत, परंतु त्यांचे नेते इतर राज्यात आहेत. हे नेते पकडले गेल्यास अर्धी समस्या संपुष्टात येईल. राज्यातील भाजप सरकारने अनेक आदिवासींना नक्षलवादी ठरवून अटक केली. ते साधे आदिवासी आहेत. त्यांना ते कशामुळे कारागृहात आहेत हे देखील माहिती नाही. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश पटनाईक यांच्या नेतृत्वात एक समिती स्थापन करण्यात आली आहे. ही यासंदर्भात अभ्यास करणार आहे. त्यानंतर कारागृहातील आदिवासींची सुटका केली जाईल, असेही बघेल म्हणाले.