तोटय़ात असलेल्या रेल्वेची स्थिती सुधारण्यासाठी रेल्वेने अनेक सोयी-सुविधांचे ‘आऊट सोर्सिग’ होत असतानाच कमी अंतराच्या प्रवासाकरिता रेल्वेचा वापर कमी होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे रेल्वेच्या चालू तिकीट विक्रीत घट होत आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात सामान्य डब्यातून प्रवास करणाऱ्यांची संख्या सरासरी १० हजारांनी घटली आहे.

नागपूर मध्यवर्ती रेल्वेस्थानकावरून धावणाऱ्या गाडय़ांच्या सामान्य बोगीतून प्रवास करणाऱ्यांची संख्या जुलै महिन्यात ६ लाख ४० हजार एवढी होती. गेल्यावर्षी याच महिन्यात ही संख्या ६ लाख ५० हजार होती. साधारणत: दरवर्षी प्रवाशांच्या संख्येत वाढ गृहीत धरून नियोजन केले जाते, परंतु प्रवाशांनी कमी अंतराच्या प्रवासाकरिता रेल्वेपेक्षा अन्य पर्यायाचा विचार केल्याचे दिसून येते. रेल्वेचा आर्थिक कणा असलेली मालवाहतूक घटल्याचे यापूर्वीच सर्वेक्षणात आढळून आले होते. आता प्रवाशांनाही रेल्वेला पर्याय शोधण्यास सुरुवात केली आहे. नागपूरपासून १५० ते २०० किमी अंतरासाठी प्रवास करणारे रस्ता वाहतुकीकडे वळले आहेत. सामान्य बोगीत असणारी प्रचंड गर्दी आणि दुसरीकडे सहज उपलब्ध होणाऱ्या खासगी बसेस यामुळे प्रवासी घटल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांचे मत आहे.

गेल्यावर्षी जून महिन्यात ६ लाख ९० हजार प्रवासी करंट तिकीट घेणारे होते. यावर्षी या महिन्यात ही संख्या ७ लाख ३० हजार ६०० एवढी आहे. ऑगस्ट महिन्यात देखील प्रवाशांच्या संख्येत फारशी वाढ झालेली नाही. चालू वर्षांत सामान्य तिकीट विक्रीत कधी घट तर कधी थोडीशी वाढ दिसून येते. यामुळे सरासरी विचारात घेतल्यास यावर्षी चालू तिकीट घेणाऱ्या प्रवाशांमध्ये वाढ झाल्याचे म्हणता येणार नाही तर मागील वर्षी एवढीच ती आहे, असे रेल्वे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

रेल्वेने खानपान, स्वच्छता आदी सुविधा आयआरसीटीसीकडे दिल्या आहेत. याशिवाय इतर सेवा खासगी कंपन्यांमार्फत चालवण्याची योजना आहे. मालवाहतुकीतून उत्पन्न आणि प्रवासी वाहतुकीतून सामाजिक बांधीलकी या दिशेने रेल्वे गाडा हाकत असताना महामार्ग विकास आणि साधनांच्या उपलब्धतेमुळे मालवाहतुकीबरोबर कमी अंतराचा प्रवासी देखील रेल्वेपासून दूर होत आहे.

सामान्य डब्यातून साधारणत: कमी अंतराचे प्रवासी प्रवास करतात. सणासुदीच्या काळात प्रवाशांमध्ये घट होऊ शकते, परंतु आरक्षित तिकट घेऊन रेल्वेने लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

– प्रवीण पाटील,  जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे.

चालू तिकीट विक्रीची स्थिती

(नागपूर मध्य रेल्वेस्थानक)

वर्षे                   प्रवाशांची संख्या

जुलै २०१७       ६ लाख ४० हजार

जुलै २०१६       ६ लाख ५० हजार