सरिसृपांच्या संशोधनात मराठी संशोधकांचा झेंडा कायम वर राहिला असून राज्यातील तरुण मराठी सरिसृपशास्त्रज्ञांची कामगिरी दिवसेंदिवस उंचावत आहे. अलीकडेच या संशोधकांनी महाराष्ट्रासह तामिळनाडूत पालीच्या तीन नवीन प्रजाती शोधून काढल्या आहेत. जूनच्या मध्यात त्यांचा पालीवरील संशोधन पेपर प्रसिद्ध झाला आहे.

देशात सरिसृप संशोधनात संशोधकांची संख्या कमी होती. पण अलीकडच्या काळात ती संख्या वाढली आहे. किंबहुना महाराष्ट्रात या संशोधकांची फळी तयार होत आहे.

राज्यातील ‘चिखलदरा’ आणि तामिळनाडूतील ‘कोली हिल’ व ‘संकरी’ या भागातून पालीच्या तीन नव्या प्रजातींचा शोध लावण्यात आला आहे. बंगळुरू येथील ‘नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल सायन्स इन्स्टिटय़ूट’ या संस्थेतील संशोधक अक्षय खांडेकर, ज्येष्ठ सरिसृप संशोधक डॉ. वरद गिरी यांच्यासह इशान अग्रवाल, अमेरिकेतील शास्त्रज्ञ अ‍ॅरन बॉवर यांची या संशोधनात महत्त्वाची भूमिका आहे. ‘हेमिडॅक्टिलस चिखलदराइन्सिस’, ‘हेमिडॅक्टिलस कोलीइन्सिस’ आणि ‘हेमिडॅक्टिलस संकरीइन्सिस’ अशी नावे या पालींना देण्यात आली आहेत. या तिन्ही पाली दगडांवरच सापडतात. जमिनीवर किंवा भिंतीवर त्या सापडत नाहीत. घरात आढळणाऱ्या पालीची गुणसूत्रे त्यात आहेत, त्यांची प्रजाती वेगळी आहे. या पाली नवीन आहेत हे दाखवण्यासाठी त्यांची गुणसूत्रे आणि आकारशास्त्राची तपासणी केली.

या तिन्ही प्रजाती ‘हेमिडॅक्टिलस’ या पोटजातीतील आहेत आणि या पोटजातीच्या ३५ प्रजातींच्या पाली भारतात सापडतात.

‘‘२०१५ मध्ये आम्ही चिखलदऱ्याला गेलो असता त्याठिकाणी एक पाल दिसली. ती नवीन वाटली होती. त्यानंतर २०१८ मध्ये तामिळनाडूला गेलो, त्याठिकाणी दोन नवीन पाली आढळल्या. या तिन्ही प्रजातींचा अभ्यास आम्ही केला. स्थानमहात्म्य समोर यायला हवे म्हणून ज्याठिकाणी त्या सापडल्या, त्याच जागेचे नाव आम्ही पालींना दिले. कारण या पाली केवळ त्याच क्षेत्रात सापडतात, इतरत्र त्या सापडत नाहीत.’’

– अक्षय खांडेकर, संशोधक