लोकसत्ता टीम

नागपूर : जिल्हयातील आर्थिक अथवा अन्य कारणांमुळे शिक्षणापासून वंचित असलेल्या १८० बालकांचा शोध घेऊन त्यांना शाळेत प्रवेश देण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नागपूरतर्फे विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे.

या मोहिमेसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नागपूरचे सचिव तथा न्यायाधीश सचिन पाटील यांनी विधी स्वयंसेवक मुकुंद आडेवार, मुखाहीद खान व राजरतन वानखेडे यांचे विशेष पथक स्थापन केले. या पथकाने जिल्हा परिषदेचे बालरक्षक समन्वयक प्रसेनजित गायकवाड यांच्यासोबत शहर व ग्रामीण भागातील विविध वाड्या, वस्त्या, झोपडप‌ट्टी, आदिवासी पाडे आणि स्थलांतरित लोकांच्या वस्त्यांमध्ये भेटी देऊन शिक्षणापासून वंचित बालकांचा शोध घेऊन त्यांचा शाळेत प्रवेश करण्याची प्रक्रीया सुरू केली.

आणखी वाचा-निम्न पैनगंगा प्रकल्पाचे काम बंद पाडले, धरण विरोधी संघर्ष समिती आक्रमक

पूर्वी शाळेत दाखल असलेल्या, परंतु काही कारणांमुळे सध्या शाळेत न जाणाऱ्या बालकांचा शोध घेऊन त्यांच्या पालकांमध्ये प्रबोधन करण्यात आले. पालकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. गौतमनगर, गि‌ट्टीगोदाम येथील दोन एकल पालक मुलींना शासनाच्या सावित्रीबाई फुले संगोपन योजनेतून आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी विधी स्वयंसेवक पथकाने मदत केली. तसेच मुलांकरीता असलेल्या शासकीय शिष्यवृत्ती योजनांची देखील पालकांना माहीती देण्यात आली.

कधीही शाळेत न गेलेली ५५ मुले

नागपूर शहरातील १०२ व ग्रामीण भागातील ७८ अशा शिक्षणापासून वंचित असलेल्या एकूण १८० बालकांना शाळेत प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. या मुलांमध्ये कधीही शाळेत न गेलेले ५५ आणि मध्येच शाळा सोडलेल्या १२५ मुला-मुलींचा समावेश आहे. त्यापैकी ३ मुले व २ मुली अपंग आहेत.