शाळेतील विक्रीमुळे व्यवसायात मंदी

सीबीएसई आणि राज्य शासनाने जरी शाळा परिसरात शालेय साहित्य विक्रीस बंदी घातली असली तरी पालकांची गर्दी दुकानांमध्ये झालेली नाही. शाळांनी प्रकाशकांबरोबर साटेलोटे केल्याने इतर पुस्तक विक्रेत्यांना आर्थिक फटका बसू लागला आहे.

शाळा सुरू होण्यास जेमतेम आठवडय़ाभराचा कालावधी उरला आहे. मात्र, दुकानांमध्ये गर्दी नसल्याची विक्रेत्यांची तक्रार आहे. दुकांनामध्ये प्रत्येक प्रकारचा माल येऊन पडला आहे. पुस्तके, वह्य़ांमुळे पाय ठेवायला जागा नाही मात्र, गर्दी नाही. जी काही पालक दुकानांमध्ये सध्या दिसून येत आहेत ते पुस्तकांच्या पूर्ण संचासाठी नाही तर गावाला गेलेली किंवा शाळेत पुस्तकांचे स्टॉल लागले असताना जे गैरहजर होते, असे पालक पुस्तकांचा शोध घेत दुकाने पालथे घालीत आहेत. मात्र, अद्यापही पाहिजे तशी गर्दी नसल्याचे व्यावसायिक सांगतात. जीएसटीमुळे आधीच हैराण झालेल्या दुकानदारांची विक्रीच होत नसल्याने त्रासिक मुद्रेने दुकानात गिऱ्हाईक येण्याची वाट पाहत आहेत.

यावर्षी पहिली, आठवी आणि  दहावीचा अभ्यासक्रम बदलला आहे. आठवी व दहावीची पुस्तके आली.        मात्र पहिलीची पुस्तके आलेलीच नाहीत. त्याची चौकशी पालकांकडून होत आहे.

मात्र, दुकानदार हतबल आहेत. शासनाच्या धोरणामुळे काही मोठय़ा शाळांनी शालेय वस्तू विक्रीला काही प्रमाणात का होईना प्रतिबंध घातला असला तरी लहान शाळा, कॉन्व्हेंट मात्र, बिनधास्तपणे गेल्यावर्षीप्रमाणेच शालेय वस्तू पालकांच्या माथी मारत आहेत. त्यामुळे पालकांना पर्याय नाही, असे रेणुका बुक्स डिस्ट्रीब्युटर्सचे मालक आशीष देशकर यांनी सांगितले.

‘सेंट जॉन’मध्ये पालकांना स्वातंत्र्य

पुस्तके, नोटबुक्स आणि इतर शालेय वस्तूंमध्ये इतर लहान-मोठय़ा कान्व्हेंट, सीबीएसई शाळा प्रकाशन आणि पुस्तक विक्रेत्यांकडून कमिशन घेत असताना मोहननगरातील सेंट जॉन हायस्कूल या ख्रिश्चन मिशनरीच्या शाळेने मात्र, पालकांना त्यांच्या सोयीने आवडेल त्या दुकानातून पुस्तके आणि इतर शालेय साहित्य खरेदी करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. राज्य शिक्षण मंडळाशी संलग्नित असलेल्या शाळेत पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण दिले जाते. पालक आनंदाने पहिली ते दहावीपर्यंतची मिळेल ती पुस्तके दुकानांतून घेऊन जात आहेत, हे विशेष.

व्यावसायिकांची वाईट अवस्था

गेल्या ५० वर्षांपासून महाल भागात दुकान आहे. मात्र, आताच्यासारखी वाईट परिस्थिती नव्हती. मालाला अजिबात उठाव नाही. दुसरे काम करू शकत नाही म्हणून दुकान उघडून बसतो. शिवाय जुनी गिऱ्हाईके येतात. म्हणून काहीतरी धंदा होतो. आता केवळ महाविद्यालयांच्या पुस्तकांवर भिस्त आहे. बीए, बीकॉम, बीएस्सीची पुस्तके विकली जातात. राज्य शासनाच्या शाळांमध्ये पहिली ते आठवीची पुस्तके शाळेतूनच मिळतात. दहावीचा अभ्यासक्रम बदलला आहे. कॉन्व्हेंट आणि सीबीएसईच्या शाळांमध्येच पुस्तके विकली जात असल्याने आमच्यापर्यंत कोणी येत नाही. पालकांना पुस्तक निवडीचे स्वातंत्र्य नाही.        – साधना वाघाडे, सुनील बुक डेपो, राजविलास टॉकीजजवळ

पुस्तक विक्रीमध्ये सुसूत्रता नाही

शाळा सुरू होण्याच्या काळात तीन तीन महिने फुरसत मिळत नसे, एवढी दुकानात गर्दी असायची. दुकानात पाय ठेवायला जागा राहत नसल्याने पालक रांगेला लागून पुस्तके घ्यायची. पुस्तके खरेदी करणे म्हणजे आख्खा दिवस त्यांना त्यात द्यावा लागायचा. आता पुस्तकांना उठावच नाही. एमआरपीवरच आम्ही सीबीएसई शाळांमध्ये पुस्तके विकायचो. जेणेकरून पालकांना एकाच ठिकाणी सर्व पुस्तके मिळतील हा त्यामागील उद्देश असतो. मात्र, शाळाही त्यांच्या आवश्यकतेबाबत काही सांगत नसल्याने पुस्तकांच्या काहीच प्रती ठेवून त्या विकेपर्यंत वाट पहावी लागते. पुस्तक विक्रीमध्ये सुसूत्रता अशी राहिली नाही.      – विनोद नांगिया, मालक, वेस्टर्न बुक डेपो, सदर