नागपूर : नागपूर महापालिकेच्या आठ-दहा शाळा जागेअभावी भाड्याच्या इमारतीत सुरु असताना महापालिकेने १८.३५ हेक्टर जमीन भाजपचे आमदार अमरीश पटेल यांच्या श्री विले पार्ले केलवानी मंडळ या संस्थेला एक रुपया प्रती चौरस फूट या नाममात्र दराने देण्याचा निर्णय घेतला आहे.

दोन वर्षांपासून नागपूर महापालिकेची निवडणूक झाली नाही. त्यामुळे येथे प्रशासक राज सुरू आहे. नागरिकांना आपल्या दैनंदिन समस्यांसाठी महापालिका कार्यालयांचे खेटे घालावे लागत आहे. महापालिकेच्या मालकीची कोट्यवधी रुपयांची जागा कवडीमोलात देण्यापूर्वी, याबद्दल प्रशासनाने लोकप्रतिनिधींना विश्वासात घेणे गरजेचे होते. मात्र, प्रशासनाने परस्पर निर्णय घेऊन सुमारे ६०० कोटी रुपये किंमतीचे भूखंड भाजपच्या आमदाराच्या घशात घातला आहे. महापालिकेने वाठोडा येथील ही जमीन सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी अधिग्रहीत केली होती.

हेही वाचा – “विरोधकांकडे विषय नसल्यामुळे आता कांद्यावर राजकारण,” देवेंद्र फडणवीस यांची टीका; म्हणाले…

भाजप नेत्यांच्या इशाऱ्यावर काम

महापालिकेच्या शाळांचा दर्जा खालावलेला आहे. दर्जा उंचवण्यासाठी कुठलेही प्रयत्न करण्यात येत नाही. मात्र, भाजप नेत्यांच्या शैक्षणिक संस्थांना भूखंड वाटपात अधिक रस घेत आहे. प्रशासन नागरी सुविधांकडे लक्ष देण्याऐवजी भाजप नेत्यांच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचे दिसून येत आहे. – विकास ठाकरे, काँग्रेसचे आमदार व शहराध्यक्ष

सिम्बायोसिसकडूनही लूट

नागपूर व विदर्भातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना सिम्बायोसिस विद्यापीठात निःशुल्क शिक्षण मिळेल अशी आशा होती. या शिक्षण संस्थेसाठी महापालिकेने मौजा वाठोडा येथे भूखंड नाममात्र दरात दिला. मात्र, सिम्बायोसिसमध्ये नागपूर आणि विदर्भातील विद्यार्थ्यांकडूनही लाखो रुपये शिक्षण शुल्काच्या नावावर वसूल केले जात आहे.

हेही वाचा – बुलढाणा : ‘लक्झरी’ व एसटीच्या धडकेत महिला ठार, २५ जखमी; मेहकर चिखली मार्गावरील दुर्घटना

सिम्बायोसिसने शिक्षणाचा बाजार मांडला आहे. अशा परिस्थितीत सिम्बायोसिस विद्यापीठाची जमीन महापालिकेने परत घेणे अपेक्षित आहे किंवा बाजारमूल्यानुसार भूखंडाचे शुल्क वसूल करणे अपेक्षित होते. हे न करता पुन्हा कोट्यवधीची जमीन कवडीमोलात खासगी संस्थेला देण्याचा प्रताप केला आहे, असेही विकास ठाकरे यांनी निवेदनात म्हटले आहे.