बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाणी पेटले असतानाच मे महिन्याच्या उत्तरार्धात नागरी भागातही पाणी टंचाईची चिन्हे दिसून येत आहे. जिल्ह्यातील धरणातील अत्यल्प जलसाठा लक्षात घेता पाणीटंचाईचे संकट गडद झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मे महिन्याअखेर ग्रामीण भागात पाणी पेटले आहे. १३ तालुक्यांपैकी बुलढाणा, मेहकर, चिखली, देऊळगाव राजा, सिंदखेडराजा, लोणार, मोताळा या सात तालुक्यांत टंचाईची तीव्रता वाढली आहे. या तालुक्यातील ६३ गावांना ६५ टँकरद्वारे होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर आपली तहान भागवावी लागत आहे. यामुळे १ लाख ७० हजार ग्रामस्थांच्या हालअपेष्टास पारावर उरला नाहीये. त्यांना प्रामुख्याने महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. दुसरीकडे, आठ तालुक्यातील २२० गावांसाठी २५६ खासगी विहीर अधिग्रहित करण्यात आल्या आहे. या अपुऱ्या पाणीपुरवठ्याद्वारे तहान व इतर गरजा भागविण्याची वेळ कमीअधिक दीड लाख ग्रामस्थांवर आली आहे. मेहकर (४८ गावे), चिखली(४६), सिंदखेडराजा (३४), देऊळगाव राजा (२८) या तालुक्यांतील टंचाईचे चित्र भीषण आहे.

आणखी वाचा-Video: वाघिणीचा चार बछड्यांसह जलविहार; नवेगाव-नागझिऱ्यातील या व्हिडिओने लावले वेड

सिंदखेडराजा, देऊळगाव राजा व मोताळा या तालुका स्थळांवर टंचाईचे सावट आहे. मोताळा नजीकच्या नळगंगा व सिंदखेडराजा, देऊळगाव राजा परिसरातील खडकपूर्णा धरणात मे अखेर पुरेल इतकाच जलसाठा उपलब्ध आहे. यामुळे पाऊणलाख लोकसंख्येच्या या नगरात धरणात चर खोदून पाणीपुरवठा करावा लागणार आहे. शेगावला पाणीपुरवठा होणाऱ्या वान धरणात पुरेसा जलसाठा आहे. मात्र, संतनगरीच्या रोकडीया नगरसारख्या विस्तारित भागात पालिकेची पाइपलाइनच नसल्याने नजिकच्या काळात टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागणार आहे.

प्रकल्पांमध्ये अत्यल्प जलसाठा

जिल्ह्यातील मोठ्या मध्यम आणि लघु प्रकल्पातील जलसाठ्याची स्थिती बिकट आहे. तीन मोठ्या धरणांपैकी खडकपूर्णा धरण कोरडे पडले आहे. येथील मृत जलसाठा (५६.७१ दलघमी) अत्यल्प आहे. नळगंगा आणि पेन टाकळी बृहत धरणात अनुक्रमे २५.३५ व १४.१६ टक्केच जलसाठा आहे. सात मध्यम प्रकल्पातील जलसाठा देखील असमाधानकारक आहे. उतावळी १९.२० टक्के, तोरणा ६.४६, मन ११.५७, कोराडी २१.१०, मस २९.४५ या धरणांतील जलसाठ्याची टक्केवारी धोक्याची घंटाच ठरावी, अशी आहे. ज्ञानगंगा (३६.६०), पलढग (३१.८२) मधील टक्केवारी तुलनेने चांगली आहे. ४१ लघु प्रकल्पाची सरासरी टक्केवारी जेमतेम १४ टक्के आहे.

आणखी वाचा-रेल्वे प्रवाशांची संख्या वाढली, टीटीईंवर आता तीन डब्यांऐवजी…

‘रोहयो’वर १९ हजार मजूर; चालू वर्षातील उच्चांक

शेतात फारशी कामे नसल्याने रोजगार हमी योजनेच्या कामांची मागणी वाढली आहे. सिंचन विहिरींची कामे वाढल्याने कामावरील मजुरांची संख्या १९ हजार २० इतकी झाली आहे. चालू उन्हाळ्यातील मजूर उपस्थितीचा हा उच्चांक ठरला आहे. जिल्ह्यातील ५०३ ग्रामपंचायत क्षेत्रात रोहयोची २८८६ कामे सुरू आहेत. यात रस्ते, वृक्षारोपण, गोठे, तुती लागवड, घरकूल या कामांचा समावेश आहे. सिंचन विहिरींची तब्बल ५२२ कामे सुरू आहे. ही कामे पाऊस सुरू होण्यापूर्वी करावयाची असल्याने नजीकच्या काळात मजुरांची संख्या आणखी वाढण्याची चिन्हे आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Signs of water shortage in buldhana urban area too water in the dam has run out scm 61 mrj