scorecardresearch

ना विद्यार्थी समाधानी, ना शिक्षक संतुष्ट, पालकही नाखूश

करोना काळातील शाळाबंदीवर ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय पुढे आला असला तरी मागील दोन वर्षांच्या काळातील या वर्गाचे अनुभव लक्षात घेतले तर ना विद्यार्थी समाधानी आहेत ना पालक, शिक्षकांनाही मुलांना शिकवण्याचे समाधान मिळत नसल्याचे दिसून आले.

ऑनलाईन शिक्षणाचा खेळखंडोबा; मागील दोन वर्षांच्या काळातील अनुभवांमुळे नाराजी

नागपूर : करोना काळातील शाळाबंदीवर ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय पुढे आला असला तरी मागील दोन वर्षांच्या काळातील या वर्गाचे अनुभव लक्षात घेतले तर ना विद्यार्थी समाधानी आहेत ना पालक, शिक्षकांनाही मुलांना शिकवण्याचे समाधान मिळत नसल्याचे दिसून आले. त्यामुळे ऑनलाईनच्या नावावर केवळ खेळखंडोबा सुरू असल्याचे चित्र आहे.

करोनाच्या पहिल्या लाटेबासून सुरू असलेली शाळाबंदी मधला अल्पकाळ सोडला तर अजूनही सुरूच आहे. त्यावर ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय शोधण्यात आला. सुरुवातीच्या काळात विद्यार्थी, शिक्षकांनी शाळेत जावे लागत नसल्याने तो आनंदाने स्वीकारला असला तरी नंतरच्या काळात यातील अडचणी पुढे येऊ लागल्या आहेत. विद्यार्थ्यांशी चर्चा केल्यावर त्यांना कधी शाळेत जातो व कधी नाही, असे झाल्याचे दिसून येते. ऑनलाईन शिक्षणात नीट शिकवताच येत नाही, असे शिक्षक सांगतात तर घरबसल्या मुले काहीच शिकत नाही, उलट ती याला कंटाळलेली आहेत, अशी प्रतिक्रिया पालक देतात. ऑनलाईनमुळे शाळेपासून विद्यार्थी दुरावले आहेत. शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील संवाद हरवला, दुसरीकडे पालकांवर आर्थिक भार वाढला, अशा प्रतिक्रिया शिक्षण क्षेत्रातून नोंदवल्या जातात. भविष्यातील सुशिक्षित नागिरक घडवणाचे उद्दिष्ट ठेवणाऱ्या शिक्षण व्यवस्थेसाठी चिंतनाचा विषय ठरत असल्याची भीती शिक्षणतज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

निवृत्त शिक्षक प्रमोद रेवतकर म्हणाले, विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी नव्हे तर त्यांच्यातील क्रीडा, सांस्कृतिक अशा सुप्त गुणांचा विकास शाळांमधूनच होतो. विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने मूल्यशिक्षण हे शाळेमधून मिळत असते. शाळेतील सवंगडय़ांसह त्यांच्यातील बौद्धिक चालनेला शाळेच्या वर्गातच वाव मिळत जाते. वर्गातील स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेला धार चढते. ऑनलाईनमुळे हे सारेच बंद असल्याने शिक्षणाचा पूर्ण खेळखंडोबा सुरू आहे.

शिक्षणाच्या मूळ उद्देशालाच फाटा

ज्ञान, कौशल्य, मूल्य, विश्वास व सवयींच्या प्राप्तीची प्रक्रिया म्हणजे शिक्षण. मात्र, ऑनलाईन शिक्षणामुळे ही प्रक्रिया दोन वर्षांपासून बंद असल्याचे आहे. अनेक मुलांचे ऑनलाईन वर्गामध्ये लक्ष लागत नाही. शिवाय परीक्षा, घटक चाचणी सारेच काही ऑनलाईन असल्याने विद्यार्थ्यांचा परीक्षा प्रती असलेले गांभीर्य कमी होत आहे, असे ऑनलाईन वर्ग घेणाऱ्या एका शिक्षिकेने मत व्यक्त केले.

क्रीडा, सांस्कृतिक स्पर्धा बंद

दोन वर्षांपासून शाळा बंद असल्याने क्रीडा, सांस्कृतिक स्पर्धा, विविध प्रकल्प उपक्रम बंद आहेत. परिणामी विद्यार्थ्यांच्या आंतरिक कलांना खीळ बसली, असे मुख्याध्यापक दिलीप तडस यांनी सांगितले.

आरोग्याची समस्या

ऑनलाईन शिक्षणामुळे मुलांचा मैदानाशी संबंध तुटला आणि तासनतास भ्रमणध्वनीसमोर बसायची वेळ आली. त्यामुळे त्यांच्यात लठ्ठपणा, दृष्टिदोष व अन्य आजार वाढत आहेत. मुले एकलकोंडी होऊ लागली. शाळेत त्यांना लाभणार मित्रांचा सहवास खुंटला याचाही त्यांच्या मानसिक स्वास्थ्यावर परिणाम होत असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

सरकारी शाळांमध्ये नावालाच शिक्षण

शाळा बंद असल्या तरी ऑनलाईन शिक्षण सुरू असल्याचा गवगवा शिक्षण विभाग करीत असला तरी खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळा वगळता शासकीय व अनुदानित शाळांमध्ये ऑनलाईन शिक्षण केवळ नावालाच आहे. एका पालकांनी सांगितले की, त्यांची मुलगी एलएडी महाविद्यालयात इयत्ता अकरावीला आहे. शाळेकडून ऑनलाईन वर्ग घेण्यात येतील असे सांगितले जाते. मात्र, दीड वर्षांत कधीच ऑनलाईन वर्ग झाले नाही. केवळ विषय शिक्षकांकडून काही नोट्स किंवा प्रश्नपत्रिका भ्रमणध्वनीवर पाठवल्या जातात.

विद्यार्थी, पालक काय म्हणतात

मी आठवीला असून काहीच दिवस शाळेत गेलो. शाळेत प्रत्यक्ष मिळणारे शिक्षण आणि ऑनलाईन शिक्षणात बरीच तफावत आहे. मित्र तर तुटलेच मात्र, ऑनलाईन शिक्षणाने शाळांची सारी मज्जाच घालवली आहे.

– केदार लुटे, विद्यार्थी.

आम्हाला दोन मुली आहेत. दोघींचेही ऑनलाईन वर्ग असतात. शाळा एकच असल्याने त्यांच्या ऑनलाईन वर्गाची वेळही एकच आहे. त्यामुळे दोघींसाठी दोन स्मार्ट फोन घ्यावे लागले. त्यांच्या इंटरनेटचा खर्च परवडणारा नाही. आता घरात वायफायच लावून घेतले. मात्र, मुलांच्या हातात इतका वेळ मोबाईल देणे हे सुद्धा योग्य नाही.

– मल्हार जिभकाटे, पालक

ऑनलाईन शिक्षणामुळे लहान मुलांच्या मानसिक आरोग्यावर फार वाईट परिणाम होतो. या वयात मुलांच्या मेंदूचा सर्वागीण विकास होत असतो. त्याला पोषक असे वातावरण हे घरच्यापेक्षा शाळेत मिळते. मात्र, ऑनलाईन शिक्षणाने हे हिरावल्याने अनेक मानिसक आजाराच्या समस्यांनी मुलांना ग्रासले आहे. पालकांनी मुलांच्या दैनंदिन हावभावांमध्ये होणाऱ्या बदलाकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक असून त्यात फारसा बदल दिसल्यास मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

– गायत्री जोशी, मानसोपचार तज्ज्ञ

मराठीतील सर्व नागपूर ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Student unsatisfied teacher parents unhappy ysh