नागपूर : स्वच्छतेसाठी विविध उपक्रम राबवले जात असताना शहरातील विविध भागातील दहन घाटांमध्ये स्वच्छतेच्या दृष्टीने मात्र महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून दुर्लक्ष केले जात आहे.विशेषत: घाटावरील सरण रचण्याची जागा, पिण्याच्या पाण्याचे ठिकाण आणि घाटावरील शोकसभा घेण्यासाठीचा परिसर अस्वच्छ असल्यामुळे नागरिकांना नेहमी त्रास सहन करावा लागतो. आयुष्याच्या शेवटी सरण रचणारे ओटे तरी स्वच्छ असावे अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शहरातील विविध भागातील २० पेक्षा अधिक दहन घाट आहेत. त्यातील शहरातील मोक्षधाम, गंगाबाई घाट महाल, अंबाझरी, सहकार नगर, मानेवाडा, झिंगाबाई टाकळी, मानकापूर, पारडी, वाठोडा ही त्यातील महत्त्वाचे स्मशानघाट असताना या घाटामध्ये सफाई कर्मचाऱ्यांकडून सफाई होत नाही. शिवाय घाटावर असलेल्या खासगी कंत्राटदारामुळे व तेथील कर्मचाऱ्यांच्या मनमानीमुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो.

हेही वाचा >>>५ हजार ९०० कुटुंबांचे विस्कटलेले धागे पुन्हा गुंफले!

शहरातील विविध दहनघाटाची जबाबदारी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे आहे. प्रत्येक घाटावर महापालिकेच्या वतीने किमान २ कर्मचारी आणि २ सफाई कामगारांची नियुक्ती करण्यात आली आहे. शहरातील विविध भागातील घाटाच्या विकासासाठी स्वतंत्र निधीची तरतूद केली जाते. मात्र, त्या दृष्टीने कुठल्याच उपाययोजना करण्यात आलेल्या दिसत नाहीत. शहरातील गंगाबाई घाटावर एकूण १५ ओटे आहेत. त्यापैकी काही ठिकाणी कचरा पडलेला तर काही ठिकाणी कठडे तुटलेले आहेत. अंत्यसंस्कारासाठी आलेल्या नागरिकांना प्रथम हातात झाडू घेऊन ओट्याच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ करावा लागतो. सफाई कामगारांची विचारपूस केली तर तो नसल्याचे सांगत तुम्ही झाडून घ्या, असे तेथील कर्मचाऱ्यांकडून सांगितले जाते. शिवाय ज्या खासगी कंत्राटदाराची माणसे घाटावर काम करतात ते प्रत्येक कामाचे मनमानी शुल्क वसूल करतात आणि त्यांच्यावर कोणाचे नियंत्रण नाही.

हेही वाचा >>>सावधान! बनावट नोटांचा सुळसुळाट; अमरावती शहरात…

प्रत्येक दहन घाटावर दररोज किमान ८ ते १० मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जातात. तशी व्यवस्था प्रत्येक घाटावर असली तरी स्वच्छतेकडे मात्र महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. घाटाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या शेजारी असलेल्या विसावाच्या आजूबाजूला कचरा पडलेला असतो. अंत्यसंस्कारासाठी आलेले लोक झाडू घेत परिसर स्वच्छ करीत असतात. घाटाच्या परिसरातील शोकसभा घेण्यासाठी असलेले सभागृहात सुद्धा कचरा पडलेला असतो. परिसरात जनावरे बसलेले असतात. रिंग रोडला लागून असलेल्या मानेवाडा घाटावर अस्वच्छता असून घाटाच्या शेजारी नाला आहे आणि तेथेच कचराघर करण्यात आले आहे. गंगाबाई घाटावर अनेक ओटे तुटलेले आहेत. लाकडे आणणण्यासाठी सुद्धा या ठिकाणी कर्मचारी राहत नसल्यामुळे नागरिकांना अनेकदा ती आणावी लागतात. अंबाझरी दहन घाटावर सरणाच्या ठिकाणी कचरा साचलेला असतो. या ठिकाणी तीन कर्मचारी आणि दोन सफाई कामगार आहे. मात्र, ते बऱ्याच वेळा उपस्थित नसतात. विद्युत दाहिनीमध्ये एकदा अंत्यसंस्कार झाल्यानंतर दुसरे पार्थिव येत नाही तोपर्यंत स्वच्छता केली जात नाही. या ठिकाणी कार्यालयाची गेल्या अनेक वर्षांपासून दुरुस्ती करण्यात आली नाही.

शहरातील दहन घाटाच्या स्वच्छतेबाबत झोन पातळीवर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नागरिकांची गैरसोय होत असेल आणि अस्वच्छता असेल तर संबंधित झोनच्या अधिकाऱ्यांना स्वच्छतेबाबत सांगण्यात येईल.- डॉ. गजेंद्र महल्ले, आरोग्य अधिकारी, महापालिका

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The deplorable condition of dahan ghats in nagpur city vmb 67 amy