नागपूर : पाच महिन्यांपूर्वी एका वाघाची शिकार होते. ही घटना ना पोलिसांना कळत ना वनखात्याला. अचानक एक दिवस दोन कुटुंबांतील वाद पोलिसांपर्यंत पोहचला. परस्परांविरोधात तक्रारी करण्यात आल्या. याला एका प्रेमप्रकरणाची पार्श्वभूमी होती.मात्र या तक्रारीतूनच वाघाच्या शिकारीचे बिंग फुटले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रेमात लोक काय काय करतील हे सागता येत नाही. प्रेमात आंधळे होऊन “प्रेमासाठी वाट्टेल ते” म्हणत काहीही करणारे लोक आहेत. प्रेमात जीव द्यायलाही तयार होतात आणि जीव घ्यायलाही तयार होतात. इथे मात्र वेगळेच घडले. मुलीच्या वडिलाने नकार दिला म्हणून मुलाच्या वडिलाने चक्क मुलीच्या वडिलांचा गुन्हाच उघडकीस आणला. तो ही मुलीच्या वडिलाने साधासुधा गुन्हा केला नव्हता तर चक्क वाघाची शिकार केली होती.
मूल तालुक्यात उथळपेठ नावाचे गाव आहे. या गावातील तरुणाचे त्याच गावातील तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. मुलाच्या वडिलांचा या प्रेमसंबंधाला नकार नव्हता आणि म्हणूनच पुढाकार घेत ते रीतसर त्यांच्या मुलासाठी मुलीचा हात मागायला मुलीच्या वडिलांकडे गेले. पण मुलीच्या वडिलांना हे लग्नच मान्य नव्हते. त्यामुळे त्यांनी चक्क मुलाच्या वडिलांनी दिलेला प्रस्ताव धुडकावून लावला. मुलाच्या वडिलांसाठी हा जबर धक्का होता.

हेही वाचा >>>चंद्रपूर: महिन्याला सव्वा कोटीपेक्षा अधिकची वसुली! उत्पादन शुल्कचे अधीक्षक संजय पाटील निलंबित

त्यांना हा अपमान सहन झाला नाही आणि ते “याचा बदला मी घेणारच” असे म्हणून तिथून निघाले. गावातील लोकांना एकमेकांची उणीदूणी माहिती असतात. मुलीच्या वडिलांनी वाघाची शिकार केल्याचे त्यांना माहिती होते. त्याची अधिक माहिती त्यांनी घेतली आणि गावभर या प्रकरणाची बोंबाबोंब केली. मग काय ! मुलीच्या वडिलांनी देखील कंबर कसली आणि “हा मुलगा आपल्या मुलीला त्रास देतो” अशी तक्रार थेट पोलीस ठाण्यात केली. त्यामुळे चिडलेल्या मुलाच्या वडिलाने देखील पोलीस ठाणे गाठले. आणि पोलिसांसमोर मुलीच्या वडिलांनी केलेला वाघाच्या शिकारीचा पाढाच वाचला. तब्बल सहा महिन्यांपूर्वी ही शिकार मुलीच्या वडिलांनी केली होती. त्यामुळे पोलिसांनी ही माहिती वनखात्याला दिली आणि वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी मुलीच्या वडिलांसह या शिकारीत सहभागी असणाऱ्या आणखी दोघांना अटक केली. त्यामुळे मुलाच्या वडिलांकडून आलेला प्रस्ताव धुडकावून लावणे मुलीच्या वडिलांना चांगलेच महागात पडले. मूल आणि परिसरातच नव्हे तर सगळीकडे या प्रकरणाची चांगलीच चर्चा सुरू झाली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The father of the boy exposes the crime of the girl father for refusing the marriage nagpur rgc 76 amy
Show comments