फॅशनेबल स्वेटर, जॅकेटला अधिक मागणी 

दरवर्षी थंडीच्या उबदार वस्त्रांमध्ये सारखेपणा नसावा म्हणून यंदा काही नवीन हवे अशी मागणी करत नागपूरकरांनी थंडीची चाहूल लागताच ऊनी कपडे खरेदी सुरू केली आहे. पण यातही वेगळपणा अर्थात फॅशनेबल कपडे खरेदीकडे युवकांचा कल अधिक आहे. पण पारंपरिक स्वेटर, शॉल आणि हातमोज्यांची मागणी कायम आहे. त्यांचे दर यंदा पाच टक्क्यांनी वाढले आहेत.

शहरात सध्या गुलाबी थंडीने शिरकाव केलाय. त्यासाठी उबदार कपडय़ांची बाजारपेठही सजली आहे. मोठय़ा मॉलसह बर्डी, सदर, महाल, गांधीबाग येथील बाजारात उबदार कपडे खरेदीची लगबग सरू झाली आहे. बैद्यनाथ चौकात तिबेट येथील व्यापाऱ्यांनी आपला डेरा टाकला आहे. त्यांच्याकडील उबदार कपडे हे स्वस्त, उत्तम आणि आकर्षक असल्याने ग्राहकांची धाव सध्या या बाजारपेठेकडे आहे. अगदी शंभर रुपयांपासून तर तीन हजार रुपयांपर्यंत येथे सर्व प्रकारचे उबदार कपडे उपलब्ध आहे. यामध्ये लहान मुलांसाठी टोपी, हात आणि पायमोजे, स्वेटर, मफलर, मोठय़ांसाठी जॅकेट, ज्येष्ठांसाठी शॉल तर गृहिणींसाठी रंगीबेरंगी पूर्ण बा’चे स्वेटर येथे उपलब्ध आहेत. मात्र युवा पिढीला काही उबदार कपडय़ांतही फॅशन साधायची असल्याने त्यांचा कल मात्र ऑनलाईन आणि मॉलमध्ये ब्राण्डेड उबदार कपडे खरेदीकडे जास्त आहे. त्यासाठी त्यांची अधिक रक्कम खर्चाची तयारी असल्याने मॉलमध्ये दोन ते सहा हजार रुपयांपर्यंत नामांकित कापड कंपनींचे स्वेटर आणि जॅकेटला अधिक पसंती मिळत आहे.

स्टोलला युवकांची पसंती 

उबदार कपडय़ांमध्येही फॅशन शोधणाऱ्या युवा पिढीला सध्या स्टोल या प्रकाराने भुरळ घातली आहे. स्टोल हा गळ्याभोवती किंवा महिला त्याची ओढणी म्हणून वापर करतात. दुचाकी चालवताना स्टोल हा कानाला पूर्णपणे बांधता येत असल्याने तरुणींमध्ये त्याची मागणी अधिक आहे. विविध रंगात आणि डिझाईनमध्ये स्टोल येत असून याच्या किंमतीही अवाक्यात आहेत. दोनशे ते पाचशे रुपयांत मिळणारा स्टोल व्यक्तिमत्त्व खुलवतो. विशेष म्हणजे, मुलांमध्येही फॅशन म्हणून त्याचा वापर होत आहे. दररोजच्या पेहरावाला मॅचिंग व्हावे, यासाठी चार-सहा स्टोलची खरेदी तरुणाई सहज करत आहेत.