नागपूर : आगामी ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा मांडव थेट देशाच्या राजधानीत पडण्याची शक्यता आहे. दिल्लीतून एकाचवेळी दोन संंस्थांची निमंत्रणे आली आहेत. दिल्लीसोबतच इचलकरंजी, औंध, औदुंबर, मुंबई आणि धुळे येथूनही निमंत्रणे आली आहेत. परंतु, आज रविवारी मुंबईत झालेल्या साहित्य महामंडळाच्या बैठकीत इचलकरंजी, मुंबई आणि दिल्ली या तीन ठिकाणी भेट देण्याचे ठरवण्यात आले. त्यातही दिल्लीबाबत यावेळी सकारात्मक विचार केला जाण्याची शक्यता आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची बैठक रविवारी मुंबईत पार पडली. यात आगामी ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी स्थळ निवड समिती नियुक्ती करण्यात आली. महामंडळाकडे निमंत्रणे पाठवण्याची मुदत ३१ मार्चपर्यंत होती. त्यानुसार, इचलकरंजी, औंध, औदुंबर, मुंबईसह दिल्लीतून दोन निमंत्रणे आली. यातील इचलकरंजी, मुंबई आणि दिल्ली या तीन ठिकाणी भेट देण्याचे या बैठकीत ठरले. स्थळ निवड समितीकडून निमंत्रण स्थळांची प्रत्यक्ष पाहणी होईल. त्यानंतर स्थळ अंतिम केले जाईल.

हेही वाचा – महायुतीतील दिग्गज प्रचारात, तर महाविकास आघाडीत मोठ्या सभेची प्रतीक्षाच; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चौथ्यांदा यवतमाळात येणार

हेही वाचा – प्रचाराचे तंत्र नवे, मुद्दे मात्र जुनेच; अकोला मतदारसंघात प्रचार मोहिमेला वेग

अमळनेरला झालेल्या संमेलनाला साहित्य रसिकांची फारशी गर्दी झाली नव्हती. तसेच लहान गावांत होणारी गैरसोय, ग्रंथविक्रीला मिळणारा अल्प प्रतिसाद, अशा काही कारणांमुळे यापुढील संमेलने जिल्हास्तरावरच भरवण्याची चर्चा महामंडळाच्या बैठकीत झाली होती. मात्र केवळ गर्दीचा निकष ठरवून ग्रामीण भागाला संमेलनापासून वंचित ठेऊ नये, अशी भूमिकाही काहींनी घेतली होती. परंतु. महामंडळाने भेटीसाठी जी स्थळे ठरवली आहेत ती शहराचीच ठिकाणे असल्याने संमेलने जिल्हास्तरावरच भरवण्याच्या निर्णयाला विरोध करणाऱ्यांची महामंडळाने फारशी दखल घेतलेली दिसत नाही. त्यामुळे या विषयावरून महामंडळ विरुद्ध इतर असा सामना रंगण्याची शक्यता आहे.