वाईट प्रवृत्तीचे दहन म्हणून प्रतिकात्मक होळी पेटवली जात असली तरीही पर्यावरणासाठी ती प्रचंड घातक ठरत आहे. होळीत लाकडासोबतच प्लॅस्टिक आणि इतर वस्तू टाकण्यात येत असल्यामुळे वातावरणातील कार्बन डायऑक्साईड आणि कार्बन मोनाक्साईड या दोहोंमध्ये सातत्याने भर पडत आहे. झाड हे कार्बन शोषणारे आणि ऑक्सिजन बाहेर टाकणारे यंत्र आहे, पण त्या यंत्रावरच होळीच्या माध्यमातून गदा आणली जात आहे. होळीच्या नावावर एकटय़ा नागपूर शहरात तब्बल अडीच हजार वृक्षांची सर्रासपणे तोड होत असल्याचे आता समोर आले आहे.
होळीला वृक्षतोड करून लाकडे जाळण्याची जुनी परंपरा आहे, पण परंपरेच्या नावाखाली अलीकडच्या काळात मोठय़ा प्रमाणावर वृक्षतोड केली जाते. पर्यावरणाचा विषय जागतिक पातळीवर गांभीर्याने घेतला जात असताना, भारतात मात्र होळीच्या नावाखाली लाखो वृक्षांचा बळी दिला जातो. होळीच्या काही दिवस आधीपासूनच या वृक्षतोडीला सुरुवात होते. लाकडासह प्लॅस्टिक आणि इतर वस्तू होळीत टाकल्या जात असल्यामुळे या मिश्रीत होळीतून ८२ टक्केपर्यंत कार्बन तयार होतो. त्यामुळे प्रदूषणाची पातळी सारखी वाढत आहे. एका होळीत किमान ४०० किलो लाकडे जाळली जातात. नागपुरात आता दिवसेंदिवस होळीची संख्या आणि उंचीसुद्धा वाढत आहे. शहरातील प्रत्येक चौकात होळी पेटवली जात असल्याने तेवढय़ाच लाकडाचा बळी यात जात आहे.
या वृक्षतोडीमुळे ऑक्सिजन तयार करणारे यंत्र गमावत असल्याची जराही खंत उत्सव साजरा करणाऱ्यांना नाही. लाकूड दहनावर गोवरी हा एक चांगला पर्याय आहे. अलीकडे शहरात गोवऱ्यांवरील अंत्यसंस्काराचे प्रमाण वाढत असल्यामुळे शहर परिसरातील कळमना, कामठी, कन्हान, हिंगणा या गावांमध्ये मोठय़ा प्रमाणावर गोवरी तयार करण्याचे काम सुरू आहे. होळीतसुद्धा लाकडांऐवजी गोवऱ्यांचा वापर केल्यास दीड ते अडीच हजार झाडांऐवजी एक लाख गोवऱ्या जाळल्या जातील. सध्या सहा रुपये किलोप्रमाणे या गावांमधून गोवरी विकली जात आहे.
एका किलोत तीन गोवऱ्या येत असून एका गोवरीमागे शेतकऱ्याला दोन रुपये मिळतात. त्यामुळे शेतकऱ्याला दोन लाख रुपये मिळतील. एक झाडाची पूर्ण वाढ होण्यासाठी सुमारे २० वर्षांचा कालावधी लागतो आणि नागपुरात दोनशे वर्षांहून अधिक जुनी अनेक झाडे आहेत. मात्र, होळीमुळे होणाऱ्या वृक्षतोडीत या झाडांचा बळी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

गोवऱ्यांच्या वापराने प्रदूषणाला आळा
होळीला लाकूड जाळण्याऐवजी गोवऱ्यांचा वापर केल्यास प्रदूषणाला आळा बसेल. गोवऱ्यांच्या दहनामुळे डासांचे प्रमाण कमी होईल. तसेच गोवऱ्यांच्या वापरामुळे अनेकांना रोजगारसुद्धा मिळेल. अनेक लोख वखारीतून लाकडे विकत आणून ते जाळतात. त्यासाठी वर्गणीसुद्धा गोळा केली जाते. मात्र, लाकूड विकत आणले काय किंवा स्वत: तोडले काय, यात झाडांचा बळी जाणार आहे. हाच वर्गणीचा पैसा शेतकऱ्यांना दिल्यास तो त्यांच्या उपयोगी पडेल.