नागपूर : भंडारा जिल्ह्यातील पवनी वनपरिक्षेत्रातील संवेदनशील जंगलातील सावरला येथील जंगलात वाघाच्या हल्ल्यात गावकऱ्याचा मृत्यू झाला. गुरुवार, चार एप्रिलला दूपारी बारा वाजताच्या सुमारास सावरला नियत क्षेत्रातील कक्ष क्र. ३१३ मध्ये ही घटना घडली. याठिकाणी दबा धरून बसलेल्या वाघाने सावरला येथील रहिवासी ताराचंद सावरबांधे यांच्यावर हल्ला केला. यात ते जागीच ठार झाले. दरम्यान, घटनेची माहिती होताच वनकर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

हेही वाचा – ‘भाजपच्या ‘धृतराष्ट्र’ने नैतिकतेचे वस्त्रहरण निमूट बघितले’, कोणाला उद्देशून केला आरोप जाणून घ्या…

हेही वाचा – वंचितच्या उमेदवाराचे भाजप कनेक्शन, अपक्षाला पाठिंबा, काय आहे रामटेकचे राजकारण ?

राज्यातील मानव वन्यजीव संघर्षात गेल्या काही वर्षात प्रचंड वाढ झाली. यात माणसेच नाही तर जनावरे देखील मृत्युमुखी पडत आहेत. राज्यसरकारकडून मोबदला म्हणून कुटुंबियांना अर्थसहाय्य देण्यात येत असले तरी हा संघर्ष खात्याला थांबवता आला नाही. विदर्भात संघर्षाच्या सर्वाधिक घटना आहेत. गेल्या सहा वर्षात राज्यात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात ४२१ मानवी मृत्यू झाले. यात सर्वाधिक १११ मृत्यू २०२२-२३ या वर्षात झाले. २०१८-१९ या वर्षात ३६, २०१९-२० या वर्षात ४७, २०२०-२१ या वर्षात ८२, २०२१-२२ या वर्षात ८६, २०२२-२३ या वर्षात १११, आणि २०२३ ते फेब्रुवारी २०२४ या वर्षात ५९ माणसे मृत्युमुखी पडली.