नागपूर : केंद्र सरकारने ‘पंतप्रधान – सूर्यघर मोफत वीज योजना’ सुरू केली आहे. त्यात तीन किलोवाॅट क्षमतेच्या छतावरील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून प्रत्येक कुटुंबाला ७८ हजार रुपयांपर्यंत सबसिडी देण्यात येणार आहे. या योजनेतील ग्राहकाच्या प्रकल्पातून गरजेहून जास्त वीज तयार झाल्यास त्यांना मोफत वीज मिळणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

घराच्या छतावर रूफ टॉप सोलर वीजनिर्मिती प्रकल्प बसवून सौरऊर्जेचा वापर करून वीजनिर्मिती करायची व ती वीज घरी वापरून विजेची गरज पूर्ण करायची, अशी ही योजना आहे. त्यात गरजेपेक्षा अधिक वीजनिर्मिती झाल्यावर वीजबिल शून्य येते. सोबत जास्तीची वीज महावितरणला विकून उत्पन्नही मिळणे शक्य आहे. केंद्र सरकारच्या नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्याच्या १९ फेब्रुवारीच्या आदेशानुसार रूफ टॉप सोलर सिस्टिम बसविणाऱ्या वीज ग्राहकांना दोन किलोवाॅट क्षमतेपर्यंत प्रत्येक किलोवाॅटला तीस हजार रुपये अनुदान मिळणार आहे.

हेही वाचा – उद्यापासून बारावीची परीक्षा : कुठल्या केंद्रावर किती विद्यार्थी परीक्षा देणार, काय काळजी घ्यावी?

दोन किलोवाॅटहून अधिक एक किलोवाॅट म्हणजे तीन किलोवाॅटचे सिस्टिम बसविणाऱ्या ग्राहकाला एका किलोवाॅटला अठरा हजार रुपये अधिकचे अनुदान मिळेल. अर्थात एक किलोवाॅटसाठी तीस हजार रुपये, दोन किलोवाॅटसाठी साठ हजार रुपये व तीन किलोवाॅटसाठी ७८ हजार रुपये अनुदान केंद्र सरकारकडून थेट ग्राहकाला मिळेल. वीज ग्राहकांनी कितीही क्षमतेची रूफ टॉप सोलर सिस्टिम बसविली तरी जास्तीत जास्त एकूण अनुदान प्रती ग्राहक ७८ हजार रुपये इतके निश्चित केलेले आहे. १३ फेब्रुवारीनंतर रूफ टॉप सोलरसाठीच्या राष्ट्रीय पोर्टलवर अर्ज दाखल केलेल्या सर्व ग्राहकांना केंद्र सरकारकडून नव्या दराने अनुदान मिळेल. राज्यातील वीज ग्राहकांना रूफ टॉप सोलर सिस्टिम बसविण्यासाठी महावितरण मदत करते. पीएम सूर्यघर नावाचे मोबाईल ॲपही यासाठी उपलब्ध आहे. देशभरात एक कोटी घरांसाठी ही योजना सुरू केलेली असून राज्यातील ग्राहकांनी योजनेचा लवकरात लवकर लाभ घेण्याचे आवाहन महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी https://pmsuryaghar.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.

हेही वाचा – कैदी संख्या वाढल्याने राज्यात आणखी १३ नवी कारागृहे

किती वीज तयार होते

एक किलोवाॅट क्षमतेच्या रूफ टॉप सोलर सिस्टिममधून दररोज सुमारे चार युनिट अर्थात दरमहा सुमारे १२० युनिट वीज तयार होते. महिना दीडशे युनिटपर्यंत वीज वापर करणाऱ्या कुटुंबाला दोन किलोवाॅट क्षमतेची रूफ टॉप सोलर सिस्टिम पुरेशी आहे. दरमहा दीडशे ते तीनशे युनिट वीज वापर असणाऱ्या कुटुंबासाठी दोन ते तीन किलोवाॅट क्षमतेची सिस्टिम पुरेशी ठरते. केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या अनुदानाच्या आधारे वीज ग्राहकांना रूफ टॉप सोलर सिस्टिम बसवण्यासाठी महावितरणने यापूर्वीच यशस्वी प्रयत्न केले आहेत. राज्यात २० फेब्रुवारीपर्यंत रुफ टॉप सोलर सिस्टिम बसविलेल्या वीज ग्राहकांची संख्या १ लाख २७ हजार ६४६ झाली असून त्यांची एकूण वीजनिर्मिती क्षमता १ हजार ९०७ मेगावाॅट झाली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Want free electricity pm suryaghar free power scheme mnb 82 ssb
First published on: 20-02-2024 at 17:59 IST