वर्धा : निवडणुकीच्या तोंडावर खासदार पुत्र पंकज तडस व त्यांची विभक्त पत्नी पूजा तडस यांच्यातील वाद चांगलाच गाजत आहे. पूजा तडस यांची बाजू मांडण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यात झालेल्या आरोपांचे खंडण करण्यासाठी पंकज रामदास तडस यांनी आज पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली.

हे प्रकरण २०२० चे आहे, असे नमूद करीत ते म्हणाले की, तेव्हा कट रचल्या गेला. त्यात मला फसवण्याचा प्रयत्न झाला. मी बळी पडलो म्हणून न्यायालयात दाद मागण्यास गेलो. वडील रामदास तडस यांनी मला संपत्तीतून बेदखल केले आहे. आजपर्यंत चार प्रकरणे पूजावर दाखल असून न्यायालयाने विविध कलमांखाली दहा व्यक्तींवर गुन्हे दाखल केले आहेत. वाद सुरु आहे. या मुलीमुळे माझ्या जीवाला धोका असल्याने मी तिच्या सोबत राहत नाही.

हेही वाचा…चंद्रपूर : निमंत्रण सत्कार सोहळ्याचे, पाठिंबा काँग्रेसला….वास्तव कळताच धक्काबुक्की….

माझ्यावर एकदा विषप्रयोग करण्यात आला होता. राजकीय बदनामी करण्यासाठी वारंवार प्रकरण पुढे आणले जाते. कट रचल्या गेल्याच्या दहा हजार ध्वनीफीत पुरावे म्हणून माझ्याकडे आहेत. पूजाला न्यायालयात हजर करण्यासाठी वृत्तपत्रात जाहिरात द्यावी लागते, असे सांगतानाच, निवडणुकीच्या तोंडावर पत्रकार परिषद घेऊन तडस कुटुंबाची बदनामी करण्याचे कारण काय, असा सवाल पंकज तडस यांनी केला.

हेही वाचा…अरे हे काय? वंचित आघाडीचे उमेदवार काँग्रेसमध्ये गेले…

माझ्याशी विवाह करण्यासाठी गुन्हेगारी कट रचल्याचा गुन्हा पूजावर दाखल आहे, असे पंकज तडस यांनी सांगितले. यावेळी त्यांनी पुरावे म्हणून काही ध्वनीफीत सादर केल्या. हेच सर्व जर सुषमा अंधारे यांनी तपासले असते, त्यांनी माझी बाजू ऐकून घेतली असती तर विरोधात बोलल्या नसत्या, असे पंकज तडस म्हणाले. यावेळी वकील आनंद देशपांडे, अमित त्रिपाठी उपस्थित होते.