चंद्रपूर : विविध क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्यांचा सत्कार सोहळा व सामाजिक मेळावा तेली समाजाच्या वतीने आयोजिला गेला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने संपूर्ण समाजाला मातोश्री सभागृहात एकत्रित केले गेले. मात्र मंचावर काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रतिभा धानोरकर व काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे यांना स्थान देत काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा जाहीर केल्याने या कार्यक्रमात एकच गोंधळ उडाला. अनेकांनी या पाठिंब्याला विरोध केला तर काहींनी समर्थन केले.

तेली युवक मंडळ, विदर्भ तेली समाज महासंघ तथा तेली समाजाच्या इतर संघटनांच्या वतीने तुकूमच्या मातोश्री सभागृहात सत्कार व सामाजिक मेळावा १२ एप्रिल रोजी आयोजित केला गेला. उल्लेखनिय कामगिरीसाठी सुभाष रघाताटे, ॲड.केतन खनके व कवडू लोहकरे यांच्या सत्काराचे औचित्य साधून काँग्रेस सेवादल संघटनेचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत खनके यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी पुढाकार घेतला. समाजाच्या सर्व बंधू भगिनींना सत्कार सोहळ्याचे निमंत्रण देवून एकत्रित आणण्यात आले. याच कार्यक्रमाला प्रतिभा धानोरकर, आमदार सुभाष धोटे यांना निमंत्रित केले गेले. सर्व कार्यक्रम सुरळीत सुरू असताना तेली समाजाच्याच काहींनी धानोरकर व धोटे कुणबी समाजाचे आहेत. त्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. अशात या दोघांना निमंत्रित का केले म्हणून प्रश्न उपस्थित केले. तिथूनच वादाला सुरूवात झाली.

हेही वाचा…अरे हे काय? वंचित आघाडीचे उमेदवार काँग्रेसमध्ये गेले…

हा वाद सुरू असतांनाच सेवादलचे खनके यांनी तेली समाजाचा धानोरकर यांना पाठिंबा जाहीर केला. त्यानंतर हा वाद आणखीच भडकला. यावेळी तेली समाजाच्या काही मंडळींनी खनके यांना घेराव करून धक्काबुक्की केली. सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने समाजाला बोलावून अशा प्रकारे पाठिंबा जाहीर करणे योग्य नाही, समाजात राजकारण आणू नका अशीही भावना व्यक्त केली.

हेही वाचा…“उद्धव ठाकरे यांचा राजकीयदृष्ट्या जनाधार संपला,” निलम गोऱ्हे यांची टीका; म्हणाल्या…

अनेकांनी समाज माध्यमावर खनके यांच्या या प्रकाराचा जाहीर निषेध नोंदविला. हा सर्व प्रकार धानोरकर व धोटे बघतच राहिले. तेली समाजाचे अनेक युवक तर कुणबी समाजाच्या नेत्यांना मंचावर स्थान दिल्यामुळे भडकले. एखादा समाज एकाच पक्षाच्या पाठिमागे उभा राहू शकत नाही. समाजात विविध विचारसरणीचे लोक काम करतात. राजेश बेले हा समाजाचा युवक लोकसभेच्या रिंगणात आहे. समाजाच्या युवकाला पाठिंबा न देता काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा जाहिर केल्यानेही अनेक जण भडकले.