वर्धा : लोकसभा निवडणुकीत राजकीय पक्ष आपल्या नेत्यांवर विविध जबाबदारी सोपवीत असतो. त्यातही उमेदवारी न मिळालेल्या नेत्यास विशेष सांभाळून घेण्याचा प्रयत्न केल्या जातो. तसेच इथेही झाले. वर्धा मतदारसंघातून लढण्यास सर्वप्रथम दावा करणारे काँग्रेस किसान मोर्चाचे अध्यक्ष शैलेश अग्रवाल यांना तिकीट मिळाली नाही. अगदी सुरवातीस त्यांनी कोणीच लढण्यास तयार नसेल तर मी लढतो पण वर्धा मतदारसंघ मित्र पक्षाला सोडू नका म्हणून धावपळ केली होती. त्यासाठी अमर काळे, चारूलता टोकस, शेखर शेंडे, नरेश ठाकरे यांच्यासह ते दिल्लीत भेटून आले होते. पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याजवळ त्या सर्वांनी आमच्यापैकी कोणालाही उमेदवारी द्या, पण वर्धा मतदारसंघ काँग्रेसकडेच राहू द्या, असे साकडे घातले होते. पण वर्धा राष्ट्रवादी पवार गटाला गेलाच.

हेही वाचा – राज्यावर वीजसंकटाचे सावट! महानिर्मितीकडे १५ दिवस पुरेल एवढाच कोळसा

हेही वाचा – सत्ता गेल्याने उद्धव ठाकरे भ्रमिष्ट! उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीसांची टीका

त्यानंतर नाराजी नाट्य रंगले. पण ते निवळले आणि काळे यांची तुतारी फुंकण्यास सर्व सज्ज झाले. अग्रवाल मात्र एवढ्यावर थांबण्यास तयार झाले नाही. म्हणून खरगे यांचे विश्वासू म्हणून ओळख दिल्या जाणाऱ्या अग्रवाल यांच्यावर एक जबाबदारी टाकण्यात आली. त्यांना निवडणूक प्रभारी म्हणून नेमण्यात आले. विशेष म्हणजे मिळालेली जबाबदारी त्यांनी स्वीकारून ते कामाला लागले आहे. उत्तर व दक्षिण गोवा, दाद्रा नगर हवेली, डी दमण व लक्षदीप या पाच लोकसभा मतदारसंघात ते काँग्रेसचे प्रभारी म्हणून काम बघत आहे. लक्षदीप येथे निवडणूक आटोपली. ती झाल्यानंतर ते वर्धेत परतले. या पाचही जागा काँग्रेस जिंकेल, असा विश्वास वाटतो. गोवा येथे तगडे आव्हान काँग्रेसने उभे केले आहे. पक्षात एकजूट असून मोदी विरोधात ही लढाई जिंकण्याचा निर्धार काँग्रेस नेत्यांनी केला असल्याचे ते सांगतात.