केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे कार्यक्रमाला उशिरा येण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यामुळे त्यांच्या कार्यक्रमाला जाणारेही उशिराच जातात. त्यामुळे कार्यक्रमाला गर्दीही होते. ते मंत्री झाल्यापासून हे असेच सुरू आहे. मात्र, रविवार त्याला अपवाद ठरला. एका कार्यक्रमाला ते वेळेत पोहोचल्याने तेथे गर्दीच नव्हती, त्यामुळे त्यांना तेथे थांबावे लागले. त्याचवेळी विद्यापीठाच्या कार्यक्रमाला त्यांना येण्यास उशीर झाल्याने तेथे चांगली गर्दी जमली. गडकरींचे गर्दीचे गणित यावेळी चुकले. भाजप कार्यकारिणीची बैठक, शोभा फडणवीस यांच्या पुस्तकाचे प्रकाशन आणि  आणि आंबेडकर गौरव ग्रथांचे प्रकाशन या तीन कार्यक्रमांना गडकरी उपस्थित राहणार होते. सकाळी गडकरी गुजरातमधील सरदार सरोवराच्या कार्यक्रमाला गेले होते. तेथून ते नागपुरात आले. भाजप कार्यकारिणीच्या कार्यक्रमाला ते अर्धा तास आधीच म्हणजे ३.३० वाजता पोहोचले. त्यामुळे अनेकांना गडकरींचे भाषण ऐकायलाच मिळाले नाही. शोभा फडणवीस यांच्या कार्यक्रमालाही ते वेळेत गेले असता तेथे सभागृह संपूर्ण रिकामे होते. दुसरीकडे गडकरी उशिराच येतात म्हणून विद्यापीठाच्या गौरवग्रंथ समारंभाला लोकंही उशिरा पोहोचले तर तेथे चांगली गर्दी जमली.