साडेचार लाख बालकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट

नाशिक : जिल्ह्य़ात रविवारी पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार असून शून्य ते पाच वर्षे वयोगटातील चार लाख ५४ हजार २१ बालकांना लसीकरण करण्यात येणार आहे. लसीकरणापासून एकही बालक वंचित राहू नये याची दक्षता प्रशासन घेत आहे. मालेगाव शहरात लसीकरणाला प्रतिसाद मिळावा यासाठी स्थानिक धर्मगुरूंसह लोकप्रतिनिधींची मदत घेण्यात येणार आहे.

पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीला जिल्हा परिषद, महानगरपालिका, जिल्हा शासकीय रुग्णालयासह आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्य़ात १९ जानेवारीला दिवसभर पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. याकरिता तीन हजार ५६४ केंद्रे उभारण्यात येणार आहेत. या केंद्रांवर एकूण नऊ हजार १६६ अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच ७२६ पर्यवेक्षकही लसीकरण मोहिमेवर लक्ष ठेवून आहेत. दुसरीकडे, लसीकरणापासून बालके वंचित राहू नये यासाठी रेल्वे स्थानक, बस स्थानक यासह सार्वजनिक ठिकाणी १५८ पथके, तर ऊसतोड कामगार आणि तत्सम घटकांच्या बालकांसाठी १६७ भरारी पथके काम करणार आहेत.

नाशिक महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फेही शहर परिसरात पल्स पोलिओ मोहीम राबविली जाणार आहे. या मोहिमेचे उद्घाटन महापौर सतीश कुलकर्णी यांच्या हस्ते होणार आहे.

मोहिमेसाठी महापालिका क्षेत्रात ७१३ केंद्रे, ९४ तात्पुरते स्थायिक पथक, ४४ फिरते पथक, सहा रात्रपाळीत काम करणारी पथके अशी यंत्रणा उभारण्यात आली आहे. यासाठी एकूण तीन हजार ४३३ कर्मचारी, ८७५ पर्यवेक्षक, प्रभाग अधिकारी म्हणून सहा वैद्यकीय (आरोग्य) अधिकारी, पशुवैद्यकीय अधिकारी, जीवशास्त्रज्ञ, मुख्य वैद्यकीय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

रविवारच्या मोहिमेनंतर शहरात घरोघरी जाऊन मुलांना लसीकरण केल्याची खात्री करून घेण्यात येईल. उर्वरित बालकांना डोस पाजण्यात येईल. ही कार्यवाही सलग पाच दिवस चालेल. त्यासाठी एकूण ६७५ पथके आणि १४८ आय.पी.पी.आय. पर्यवेक्षक काम करतील. प्रत्येक पथकात दोन कर्मचारी असतील. प्रत्येक पाच पथकासाठी एक पर्यवेक्षक त्या कामाचे मूल्यमापन करतील. या सर्व कामाचा आढावा एकत्रितरीत्या शासनास कळविण्यात येईल.

मोहिमेसाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे आणि वैद्यकीय (आरोग्य) अधिकारी डॉ. नितीन रावते यांनी केले आहे.