मालेगाव महापौर, उपमहापौर निवडणूक

मालेगाव : अडीच वर्षे महापालिकेत अस्तित्वात असलेली काँग्रेस-शिवसेना आघाडी गुरुवारी होणाऱ्या महापौर, उपमहापौर पदाच्या निवडणुकीतही कायम ठेवण्याचे फर्मान थेट मुंबईतील काँग्रेस-सेना नेत्यांनी काढल्याने येथील महापालिकेतील सत्ता कायम राखण्यात काँग्रेस, सेना आघाडी सहज यशस्वी होण्याची चिन्हे दिसत आहेत. काँग्रेस-सेना या दोन पक्षांची आघाडी महापालिकेत बहुमताचा जादुई आकडा सहज गाठण्यासारखी स्थिती असल्याने भाजपनेही या आघाडीला समर्थन देण्याचे मंगळवारी जाहीर केले. त्यामुळे काँग्रेस-सेना आघाडीचे बळ आणखी वाढले आहे.

अडीच वर्षे महापालिकेत काँग्रेस-सेना आघाडीची सत्ता आहे. काँग्रेसचे शेख रशिद हे महापौर, तर सेनेचे सखाराम घोडके हे उपमहापौर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस-जनता दलाने एकत्र येऊन स्थापन केलेली महागठबंधन आघाडी ही विरोधात आहे. सेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने राज्यात सत्तान्तराचा प्रयोग यशस्वी केल्याच्या पार्श्वभूमीवर, येथील महापौर-उपमहापौर पदाच्या निवडणुकीत सत्तेचे फासे कसे पडतात याची उत्सुकता होती. महापालिकेतील सत्तेचे गणित सोडविण्यासाठी सेनेवर मोठी भिस्त असल्याने काँग्रेस आणि विरोधी महागठबंधन या दोन्ही गटांकडून सेनेला गळाला लावण्याचे प्रयत्न सुरु होते. अखेरीस मुंबईतून चक्रे फिरल्यानंतर सेनेने काँग्रेसबरोबर आघाडी कायम ठेवण्याचे निश्चित केले. ८४ सदस्यांचे संख्याबळ असलेल्या महापालिका सभागृहात एक

जागा रिक्त आहे. उर्वरित ८३ सदस्यांमध्ये काँग्रेस-सेना ४२ तर महागठबंधनकडे २५ सदस्य आहेत. तसेच भाजपकडे नऊ  आणि एमआयएमकडे सात सदस्य आहेत. बहुमतासाठी आवश्यक असलेला ४२ हा जादुई आकडा काँग्रेस आणि सेना आघाडीकडे असल्याने विरोधकांचे अवसान गळाल्यासारखी स्थिती निर्माण झाली. त्याचमुळे भाजपचे गटनेते सुनील गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेस-सेना आघाडीला समर्थन देण्याचे जाहीर केले. विशेष म्हणजे गेल्यावेळी भाजपने महागठबंधन आघाडीला साथ दिली होती. या सर्व अनुकूल समीकरणांमुळे काँग्रेस आघाडीच्यादृष्टीने ही निवडणूक अगदीच एकतर्फी झाली आहे.

त्यामुळे महापौरपदी काँग्रेसच्या ताहेरा शेख आणि उपमहापौरपदी शिवसेनेचे नीलेश आहेर यांची निवड निश्चित मानली जात आहे. नाशिकच्या प्रभारी जिल्हाधिकारी भुवनेश्वरी यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी सकाळी ११ वाजता महापालिका सभागृहात या दोन्ही पदांसाठी निवडणूक घेण्यात येणार आहे. सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम मुदतीत काँग्रेसकडून ताहेरा शेख, महागठबंधन आघाडीकडून शान ए हिंद तर एमआयएमकडून सादीया लईक हाजी यांनी महापौरपदासाठी अर्ज दाखल केले. उपमहापौरपदासाठी शिवसेनेचे नीलेश आहेर, महागठबंधनचे अन्सारी अमानतुल्ला पिर मोहम्मद आणि एमआयएमकडून शेख अब्दुल माजिद शेख युनुस यांनी अर्ज दाखल केले आहेत.

संख्याबळ असे आहे

*   काँग्रेस  २९

*   महागठबंधन २५

*   शिवसेना  १३

*   भाजप  नऊ

*   एमआयएम सात

*   रिक्त  एक