बाल शिक्षणाच्या शास्त्रीय दृष्टिकोनातून समुपदेशन अभ्यासक्रम तयार करणे काळाची गरज आहे. बालशिक्षण परिषदेतर्फे शिक्षणतज्ज्ञांच्या मदतीने हा अभ्यासक्रम तयार करण्यात येणार आहे. तसेच महाराष्ट्रासह देशभरात समुपदेशन केंद्रे सुरू केली जाणार आहेत. समुपदेशक होऊ  इच्छिणाऱ्यांना या उपक्रमाशी जोडून घेतले जाईल. अभ्यासक्रम निर्मिती आणि समुपदेशन केंद्र सुरू करण्याच्या ठरावाला महाराष्ट्र बालशिक्षण परिषदेतर्फे नाशिक येथे आयोजित तीनदिवसीय परिषद आणि २६ व्या वार्षिक अधिवेशनात मंजुरी देण्यात आली.

त्र्यंबक रोडवरील इस्पॅलियर हेरिटेज स्कूल येथे बालशिक्षण परिषद आणि अधिवेशनाचा रविवारी समारोप झाला. ‘बालविकासासाठी आम्ही’ असा परिषदेचा विषय होता. राज्यात ५०० समुपदेशन केंद्रांची उभारणी करताना टप्प्याटप्प्यात देशभरात विस्तार करण्याचे या वेळी निश्चित करण्यात आले. तसेच समुपदेशन अभ्यासक्रमाचे स्वरूप आणि आराखडा याविषयीदेखील चर्चा करण्यात आली.