|| चारुशीला कुलकर्णी

बालदिनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेचा मुद्दा चर्चेचा

अल्पवयीन मुलीवर झालेला अत्याचार..अंध शाळेत काळजी घेणाऱ्या व्यक्तीकडूनच मद्यधुंद अवस्थेत विद्यार्थ्यांना झालेली मारहाण, शाळेत शिक्षकाकडूनच विद्यार्थिनीची छेड काढण्यात येणे, अशा विविध घटनांमुळे बालकांचे हक्क आणि त्यांची सुरक्षा हा मुद्दा चर्चेत आला आहे. याविषयी तक्रार करण्यास किंवा उघडपणे बोलण्यास फारसे कोणी तयार नसल्याचे चित्र शहर परिसरात आहे. बालदिनाच्या पार्श्वभूमीवर हे वास्तव समोर येत आहे.

अत्याचार म्हणजे केवळ लैंगिक शोषण नव्हे, तर बालकांचे मानसिक, शारीरिक, आर्थिकदृष्टय़ा होणारे खच्चीकरण होय. याविषयी पालक, प्रशासन यांच्यात कमालीची उदासीनता आहे. शालेय पातळीवर पालक-शिक्षक संघ, संवाद पेटी यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधल्याचा दावा शाळेकडून होत असला तरी मुळात पालक-शिक्षक यांना बाल हक्काचे कितपत ज्ञान आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

अनेक वेळा शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या चुकांसाठी त्यांना शिक्षा केली जाते. ही शिक्षा कधी कधी मुलांच्या जिवावर उठते. कधी पालकांनी शैक्षणिक शुल्क भरले नाही म्हणून निकाल राखून ठेवणे, परीक्षेस बसू न देणे, वर्गाबाहेर उभे करणे असे काही प्रकार होतात. यामुळे पालक आणि शिक्षण संस्था यांच्यात वाद होत असताना विद्यार्थी नाहक भरडले जातात. अन्य प्रकारांत गृहपाठ किंवा शाळेची अन्य कामे केली नाहीत म्हणूनही शिक्षा होते. यामध्ये पालक फारसे बोलत नाहीत. मुलांवरच दोषारोप करण्यात येऊन हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होतो.

काही ठिकाणी पालकांनी तोंड उघडलेच तर मुलांना वेगवेगळ्या शिक्षेला सामोरे जावे लागते. यामुळे मुले भीतीमुळे काहीच बोलत नाहीत. यासाठी संवादपेटी किंवा शिक्षक-पालक संघ महत्त्वपूर्ण भूमिका निभावू शकते, परंतु पालकांनाच बाल हक्कांची माहिती नसल्याकडे बालहक्क सामाजिक कार्यकर्त्यां शोभा पवार यांनी लक्ष वेधले. यामुळे बालकांसाठी काम करणाऱ्या संस्था किंवा शासकीय यंत्रणेकडे या संदर्भात केवळ बोटावर मोजण्याइतक्या तक्रारी येत आहेत.

दुसरीकडे, घरातही मुलांना सुरक्षिततेचे वातावरण मिळावे यासाठी पालक प्रयत्न करतात. पण शाळा आणि घर यापलीकडे मुले समाजात वावरत असतांना त्यांच्या सुरक्षिततेचा विचार कोणीही करीत नाही. यातूनच बालकांचे अपहरण, त्यांचे लैंगिक शोषण, त्यांना कोणाकडून तरी होणारा मानसिक त्रास असे विविध प्रकार घडतात. सजग पालक म्हणून बालकांना उपेक्षित वागणूक न देता त्यांच्याशी संवाद ठेवणे गरजेचे आहे. मुलांना माणूस म्हणून आनंदी जीवन जगता येईल, असे वातावरण देणे म्हणजे बाल हक्काची पालकांनी जाणीव ठेवावी, असे आवाहन बालकांसाठी काम करणाऱ्या संस्थांनी केले आहे.

बालहक्कांविषयी बोलणे आवश्यक

बालहक्कांविषयी विविध माध्यमांतून जागरूकता होत असली तरी पालक या विषयावर उघडपणे समोर येऊन बोलण्यास तयार नाहीत. उलटपक्षी मुलांनाच समज देऊन ते प्रकरण दडपले जाते. दुसरीकडे शोषण म्हणजे अत्याचार या गैरसमजातून पालक अद्याप बाहेर आलेले नाहीत. मुलांना होणारी शिक्षा, त्यांना दिली जाणारी दुय्यम दर्जाची वागणूक, वाईट स्पर्शाशी होणारा परिचय हे एक प्रकारे शोषण आहे. याविरुद्ध आवाज उठविणे गरजेचे आहे.      – शोभा पवार, बालहक्क कार्यकर्त्यां