राज्यात यंदाच्या हंगामातील सर्वात कमी तापमानाची नोंद
सर्वत्र भरलेला प्रचंड गारवा.. दिवसा बोचणारा थंडगार वारा.. त्यापासून बचावासाठी चाललेली धडपड.. नाशिकमध्ये थंडीने मुक्काम ठोकत बुधवारी हंगामातील नीचांकी अर्थात सहा अंशांची नोंद केली आणि राज्यातील थंड हवेचे ठिकाण या आपल्या ओळखीवर पुन्हा शिक्कामोर्तब केले. एरवी, तापमान कमी होणे आणि थंडीची लाट येणे नाशिककरांना नवीन नाही. दर वर्षी जानेवारी वा फेब्रुवारी महिन्यांत तापमान या पातळीवर जात असते. तथापि, चार वर्षांनंतर डिसेंबर महिन्यात प्रथमच पारा इतका खाली घसरला. वातावरणाचा बदललेला नूर नववर्ष स्वागताच्या तयारीत उत्साह भरणारा आहे.
दिवाळीनंतर नाशिकसह उत्तर महाराष्ट्राची वाटचाल नेहमीप्रमाणे थंडीच्या दिशेने सुरू झाली. डिसेंबर महिन्यात तिचे अस्तित्व ठळकपणे जाणवू लागले. मध्यंतरी ढगाळ वातावरणामुळे अंतर्धान पावलेल्या थंडीचे आकाश निरभ्र झाल्यानंतर दमदार पुनरागमन झाले. तेव्हापासून सुरू झालेल्या तापमान कमी होण्याच्या शृंखलेत बुधवारी नवा अध्याय जोडला गेला. या दिवशी सर्वात कमी म्हणजे सहा अंशांची नोंद झाली. मागील पाच दिवसांपासून तापमानात चढ-उतार सुरू होती. तीन दिवसांपूर्वी १३ अंशांवर असणारे तापमान मंगळवारी सहा अंशांनी घसरून सातवर आले. बुधवारी त्यात आणखी एका अंशाने घट झाली. अकस्मात बदललेल्या वातावरणाने नाशिक चांगलेच गारठले. भल्या सकाळी प्रभात फेरीसाठी घराबाहेर पडणारे नागरिक असोत वा शाळा व महाविद्यालयांत चाललेले विद्यार्थी असोत साऱ्यांना उबदार कपडे परिधान करणे क्रमप्राप्त ठरले. कडाक्याच्या थंडीपासून बचाव करण्यासाठी ठिकठिकाणी शकोटय़ांचा आधार घेतला जात आहे. बोचऱ्या वाऱ्यामुळे दिवसभर वातावरण थंडगार राहिले. त्याचा परिणाम दैनंदिन जनजीवनावर झाला. थंडीचा कडाका पाहून काही पालकांनी पाल्यांना शाळेत न पाठविणे पसंत केले. या वातावरणात सर्दी, खोकला व ताप यांसारख्या आजारांनी डोके वर काढले असून डॉक्टरांकडे रुग्णांची संख्या वाढली आहे.
मागील पाच वर्षांतील तापमानाचा आढावा घेतल्यास नेहमीपेक्षा यंदाचा हिवाळा वेगळा ठरणार असल्याचे दिसते. एरवी डिसेंबर महिन्यात अपवादात्मक स्थितीत तापमान सहा अंशापर्यंत खाली गेले आहे. मागील वर्षी म्हणजे १५ डिसेंबर रोजी ६.३ तर २९ डिसेंबर २०१४ रोजी ते ६.१ अंशांपर्यंत घसरले होते.
१५ डिसेंबर २०१३ रोजी नाशिकच्या तापमानाने ६.५ अंशांची पातळी गाठली. तत्पूर्वी अर्थात २७ डिसेंबर रोजी ६.२ अंशांची नोंद झाली. या तिन्ही वर्षांत तापमानाची पातळी सहा अंशांहून अधिक राहिली. २७ डिसेंबर २०११ मध्ये नाशिकचे तापमान ५.६ अंशांवर गेले होते. चार वर्षांनंतर नाशिकच्या तापमानाने सहा अंशांची पातळी गाठल्याचे दिसून येते.
ही स्थिती कायम राहिल्यास पुढील काळात त्यात आणखी घट होऊ शकते.

मागील पाच वर्षांतील नीचांकी तापमान
ल्ल ७ जानेवारी २०११ – ४.४
ल्ल ९ फेब्रुवारी २०१२ – २.७
ल्ल ६ जानेवारी २०१३ – ४.४
ल्ल २९ डिसेंबर २०१४ – ६.१
ल्ल ११ जानेवारी २०१५ – ५.६

अधिक काळ गारव्याच्या अनुभूतीची शक्यता
वातावरणातील बदलांनी या वर्षी सर्वाधिक काळ गारव्याची अनुभूती मिळण्याची शक्यता आहे. दिवाळीनंतर सुरू झालेल्या थंडीने डिसेंबरच्या अखेरीस नीचांकी पातळीची नोंद केली. दर वर्षी सर्वात कमी तापमान सर्वसाधारणपणे जानेवारी वा फेब्रुवारी महिन्यात नोंदले जाते. यंदा डिसेंबरमध्येच ही पातळी गाठली गेल्याने हंगाम संपुष्टात येईपर्यंत म्हणजे किमान दीड ते दोन महिने हिवाळ्याचा आस्वाद घेता येईल, अशी स्थिती आहे.

द्राक्ष उत्पादक धास्तावले
तापमान जसजसे कमी होत आहे, तशी द्राक्ष उत्पादकांमध्ये अस्वस्थता पसरत आहे. थंडीची लाट काही दिवस कायम राहिल्यास द्राक्ष बागांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कडाक्याच्या थंडीमुळे द्राक्षमण्यांना तडे जाण्याची भिती असते. धुके व दव साठून राहिल्याने द्राक्ष मण्यांवर डागही पडू शकतात. थंडीपासून बचावासाठी द्राक्ष बागांवर औषधांची फवारणी करावी लागते. यामुळे उत्पादनखर्चात वाढ होते. त्यात थंडीचा प्रभाव किती दिवस राहणार हे सांगणे अवघड असल्याने उत्पादक धास्तावले आहेत.

कडाक्याच्या थंडीमुळे नाशिककरांची बुधवारची सकाळ अशी होती. थंडीपासून बचाव करण्यासाठी प्रत्येकाला धडपड करावी लागली.