महापालिकेच्या वतीने अशोक स्तंभ ते त्र्यंबक नाका रस्ता सुंदर करण्यासाठी काम सुरू करण्यात येत असल्याने वाहतुकीवर र्निबध  येणार आहेत. या मार्गावरील एका बाजूची वाहतूक बंद ठेवण्यात येऊन एकाच बाजूने वाहनांची ये-जा होणार आहे. रस्त्याच्या कामात या मार्गावरील शाळा, महाविद्यालयांचा विचार झाला नसल्याने विद्यार्थ्यांमुळे होणाऱ्या गर्दीचे नियोजन कसे करायचे हा प्रश्न शिक्षण संस्थांना सतावत आहे. या संदर्भात प्रकल्प समन्वयकांनी शाळा व्यवस्थापनाला विश्वासात न घेता कामास सुरूवात केल्याचा आक्षेप घेतला जात आहे. लवकर तोडगा न काढल्यास गंभीर स्थिती निर्माण होईल आणि त्यास महापालिका, स्मार्ट सिटी कंपनी जबाबदार राहील, असा इशारा शाळांनी दिला आहे.

स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू केलेल्या पथदर्शी अशोक स्तंभ ते त्र्यंबक नाका रस्त्याच्या कामामुळे वाहतुकीवर र्निबध आणण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. एका बाजूने रस्ता अडवत दुसऱ्या रस्त्याने ये-जा करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मुळात अरुंद रस्त्यावर मोर्चा आणि आंदोलने होत असतात. यामुळे वाहतुकीचा बोजवारा उडतो.  या घडामोडींना दररोज तोंड द्यावे लागणार असल्याने परिसरातील शाळा, महाविद्यालयांना विद्यार्थ्यांच्या गर्दीचे नियोजन करायचे कसे, असा यक्ष प्रश्न समोर आहे. न्यायालयाच्या बाजुकडीला रस्ता खुला असतांना आदर्श विद्यालय, शिक्षणशास्त्र महाविद्यालय, बिटको हायस्कूल, शासकीय कन्या विद्यालयालगतचा रस्ता बंद ठेवण्यात आला आहे. सकाळ आणि दुपारच्या सत्रात शाळा भरते. या ठिकाणी विद्यार्थ्यांची गर्दी, त्यांना सोडण्यासाठी येणारी वाहने, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची वाहने यांची ये-जा कशी होईल, असा प्रश्न  आहे. न्यायालयालगतचा रस्ता खुला असला तरी त्या ठिकाणी वाहने थांबण्यास परवानगी नाही. तसेच एकाच रस्त्यावरून दुतर्फा वाहतूक सुरू असतांना विद्यार्थ्यांनी भुयारी मार्गाचा अवलंब केला तरी ‘आदर्श’च्या विद्यार्थ्यांना बरेच अंतर पायी चालत यावे लागेल. काहींना सातपूर, सिडको, गोविंदनगरच्या दिशेने जायचे असेल तर त्यांनी रस्ता कसा ओलांडायचा, स्कूल बस किंवा विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या खासगी वाहनांनी थांबायचे कुठे, बस थांबा कुठे असेल या विषयी कसलेही नियोजन नाही किंवा पर्यायी व्यवस्था नाही. यामुळे बिकट स्थिती ओढावल्यास त्यास महापालिका तसेच स्मार्ट सिटीचे व्यवस्थापन जबाबदार असेल असा इशारा शाळा, महाविद्यालयांनी दिला आहे.

शिवाजी स्टेडियममध्ये वाहने थांबवण्याची मागणी

शाळेतील विद्यार्थ्यांना ने-आण करणारी वाहने थांबण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमचे दोन दरवाजे खुले करण्यात यावेत. ही गर्दी तेथे थांबली तर वाहतूक कोंडी होणार नाही तसेच गर्दीचे नियोजन करणे सोपे होईल. विद्यार्थी वाहतूकही सुरक्षित होईल, याकडे काही शाळांकडून लक्ष वेधले जात आहे.

१५ जूनपासून शाळा सुरू होत असताना स्मार्ट सिटीअंतर्गत रस्ता बंद करताना महापालिका किंवा स्मार्ट सिटी प्रकल्प समन्वयकांकडून कुठल्याही प्रकारचा लेखी आदेश किंवा माहिती देण्यात आली नसल्याची तक्रार केली. शाळेला विश्वासात न घेता हा प्रकल्प हाती घेताना विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा कोणताही विचार झालेला नाही. या आवारात साडेचार हजाराहून अधिक विद्यार्थी शिकत आहेत. त्यांच्या सुरक्षिततेचा विचार गरजेचा आहे. या संदर्भात लवकर तोडगा न निघाल्यास जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेण्यात येईल.

रेखा काळे, मुख्याध्यापिका, डी. डी. बिटको गर्ल्स हायस्कूल

शाळेच्या सकाळ आणि दुपार सत्रातील वेळा लक्षात घेऊन वाहतुकीचे नियोजन केल्याचे स्पष्ट केले. गर्दीमुळे वाहतुकीला अडथळा होईल, अशी कुठलीही कृती घडणार नाही. तशी सूचना स्मार्ट सिटी कंपनीसह महापालिकेला करण्यात आली आहे. वेळेवर वाहतूक नियोजनाबाबत काही पावले उचलावी लागली तर तशी व्यवस्थाही करण्यात आली आहे.

लक्ष्मीकांत पाटील, पोलीस उपायुक्त (वाहतूक)