नाशिक: लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी नाशिक मतदारसंघासाठी तीन जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. दिंडोरी मतदारसंघासाठी एकही अर्ज दाखल झाला नाही. दोन्ही मतदारसंघासाठी २२ उमेदवारांनी ३१ अर्ज खरेदी केले. बुधवारी महाराष्ट्र दिनाची शासकीय सुट्टी आहे. त्यामुळे अर्ज दाखल करण्यासाठी केवळ दोन दिवसांचा अवधी असल्याने अखेरच्या टप्प्यात उमेदवारांची गर्दी होण्याची चिन्हे आहेत.
प्रारंभीचे दोन दिवस अर्ज खरेदी आणि जमा करण्यासाठी दिसलेली लगबग तिसऱ्या दिवशी काहीशी थंडावली. अनेकांनी अर्ज खरेदी केले, पण दाखल करणाऱ्यांचे प्रमाण तुलनेत कमी होते. नाशिक लोकसभा मतदार संघातून तीन उमेदवारांचे अर्ज दाखल झाले. सिद्धेश्वरानंद गुरू स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती यांनी शक्ती प्रदर्शन करुन अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. कमलाकर गायकवाड (दलित शोषित पिछडा वर्ग अधिकार दल) आणि जितेंद्र भाभे (अपक्ष) यांनी अर्ज भरला. या दिवशी दिंडोरीतून एकही अर्ज दाखल झाला नाही. नाशिक लोकसभा मतदार संघातून उमेदवारी करणारे स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती यांनी फेरी काढून शक्ती प्रदर्शन केले. याआधी शांतिगिरी महाराजांनी अर्ज दाखल केला आहे. दिंडोरी मतदारसंघासाठी आठ इच्छुकांनी १२ अर्ज घेतले. नाशिक मतदारसंघासाठी १४ जणांनी १९ अर्ज घेतले.
हेही वाचा : दिंडोरीत पाठिंब्याचा निर्णय सात मेनंतर – स्वाभिमानी शेतकरी संघटनेची भूमिका
नाशिकसाठी सर्वाधिक इच्छुक
अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवसापासून आतापर्यंत दोन्ही मतदारसंघातून ११९ उमेदवारांनी २२१ अर्ज खरेदी केले आहेत. यात नाशिकसाठी सर्वाधिक ८७ इच्छुकांनी १४८ अर्ज तर, दिंडोरीत ३२ जणांनी ७३ अर्ज नेले आहेत. अर्ज नेणाऱ्यांच्या तुलनेत दाखल करणाऱ्यांचे प्रमाण बरेच कमी आहे. बुधवारी महाराष्ट्र दिनाची सुट्टी आहे. त्यानंतर तीन तारीख अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. त्यामुळे दोन आणि तीन तारखेला अर्ज भरण्यासाठी एकच गर्दी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.