सात वर्षांपासून दुष्काळात मोफत जलसेवा

नाशिक : जिल्ह्य़ात दिवसेंदिवस दुष्काळाच्या झळा तीव्र होत असताना काही ठिकाणी प्रशासनाकडून तहान भागविण्यासाठी पाण्याचा टँकर उपलब्ध करून दिला जात आहे. दुष्काळ ही संधी साधून काही जण पैसे घेऊन पाणी देण्याचे काम करत  आहेत. मात्र तोरंगण या आदिवासी पाडय़ावरील काशिनाथ बोरसे हा युवक आपल्या स्वत:च्या विंधन विहिरीतून एक पैसाही न घेता गेल्या सात वर्षांपासून संपूर्ण गावाची तहान भागवत आहे.

हरसूलपासून सुमारे १० किलोमीटरवर तोरंगण हा दुर्लक्षित आदिवासी पाडा आहे. पाडय़ावर ३६० घरे असून लोकसंख्या दोन हजारांहून अधिक आहे. पाडय़ावर दोन हातपंप, तीन विंधनविहिरी आहेत. गावापासून तीन किलोमीटरवर हरसूल, खर्डीपाडी परिसरात कास नदी आहे. परंतु उन्हाळ्यात विहिरीतील पाणी आटल्यावर गावात पाणीच येत नाही. जलवाहिनी योजना गावासाठी मंजूर असल्याने टँकरही येत नाही.

पाणी टंचाईच्या भीषणतेचे चटके अनेकांना बसले आहेत. त्यांपैकीच काशिनाथ बोरसे हा युवा शेतकरी.  गावातील हातपंपावरून ऐन उन्हाळ्यात पाणी आणायचे तर त्यासाठी रात्री पंपाजवळच थांबल्यावर दुसऱ्या दिवशी दुपारी किंवा सायंकाळी पाणी भरण्यासाठी नंबर येण्याची वाट पाहावी लागायची. या पाश्र्वभूमीवर सात वर्षांपूर्वी पाण्यासाठी होणारी वणवण पाहून विंधनविहीर खोदण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी ३५ हजार रुपयांचे कर्ज काढले. जमा असलेली रक्कम, उसनवारी असे मिळून ५० हजार रुपये जमा करून विंधनविहीर खोदली. विंधनविहीरीला पाणीही लागले.  घराची तहान भागली, परंतु गावाचे काय, हा विचार अस्वस्थ करत होता. कुटुंबातील इतर सदस्यांशी काय करावे, याविषयी चर्चा केली. आपली गरज पूर्ण झाल्यानंतर उर्वरित पाणी गावासाठी देण्याचे ठरविले. विंधनविहीर खोदल्यापासून आजपर्यंत तिचे पाणी गावासाठी मोफत उपलब्ध करून दिले आहे. कोणाकडूनही एक रुपयाही घेतलेला नाही, असे काशिनाथने सांगितले.

गावात पाण्यासाठी पन्नास लाख रुपये खर्च करून दोन सरकारी योजना राबविण्यात आल्या. परंतु नियोजन न करता केलेल्या या कामामुळे संपूर्ण खर्च वाया गेला.

यंदाही  दुष्काळाच्या गर्तेत असतांना काशिनाथ यांच्या खासगी विंधनविहिरीचा आधार असल्याची भावना ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहे.