चारुशीला कुलकर्णी

माता-बालमृत्यूवर नियंत्रण आणण्यासाठी आरोग्य विभाग विविध माध्यमांतून प्रयत्न करत असून नाशिक जिल्हा परिसरात आरोग्य विभागाकडून किशोरवयीन मुला-मुलींसाठी ‘मैत्री’ क्लिनिक सुरू झाले आहे. या माध्यमातून मुलींना पोषण आहारासह आवश्यक औषधोपचार सुरू करण्यात आले आहेत. नाशिक जिल्ह्य़ात मालेगाव, त्र्यंबक, पेठ, इगतपुरी येथे बाल उपचार केंद्र तर कुपोषणावर मात करण्यासाठी नाशिकसह कळवण, सुरगाणा आणि दिंडोरी येथे ‘पोषण आहार केंद्र’ सुरू करण्यात आले आहे.

बहुतांश मातांचे १८ वयाच्या आधीच लग्न झालेले असणे, प्रसूतीपूर्व काळात कुठल्याही प्रकारची आरोग्य सेवा न घेणे, फॉलिक अ‍ॅसिडसह अन्य आवश्यक औषधोपचार, चाचण्या न करणे, या काळात जेवढय़ा प्रमाणात वाढायला हवे होते ते न वाढणे, आदी कारणांमुळे प्रसूतीनंतर अर्भकाच्या मृत्यूत वाढ होत आहे.  त्या पाश्र्वभूमीवर आरोग्य विभागाने किशोरवयीन मुलींच्या आरोग्याकडे लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. यासाठी आरोग्य विभागाची १०६ प्राथमिक आरोग्य केंद्रे, ३० ग्रामीण तसेच उपजिल्हा रुग्णालयात ‘मैत्री’ क्लिनिक सुरू करण्यात आले आहे. या माध्यमातून किशोरवयीन मुलींचा आहार, विहार, त्यांना आवश्यक औषधोपचार सुरू करण्यात आले आहेत. गरज पडल्यास महाविद्यालयाच्या आवारातही आरोग्य शिबीर घेत मुलींच्या काही तपासण्या करून त्यांना औषधोपचार सुरू करण्याविषयी सूचना करण्यात आली आहे.

शासकीय रुग्णालयात प्रसूती झाल्यानंतर किंवा घरी जन्माला आलेल्या बालकांना कमी वजन, वेळेआधीच जन्म, फुप्फुसाची वाढ न होणे, जन्मत व्यंग तसेच जन्मत श्वसनाचा आजार यामुळे जिल्हा शासकीय रुग्णालयातील बालकांच्या अतिदक्षता कक्षात (एसएनसीयू) वर्षअखेर म्हणजेच मार्चपर्यंत तीन हजार ७०२ अर्भके दाखल झाली. त्यातील दोन हजार ६६६ अर्भके उपचारांनंतर घरी परतली, तर ३३३ अर्भकांचा मृत्यू झाला. जूनअखेर ९१७ अर्भके दाखल झाली. त्यातील ७२२ जणांना उपचारांनंतर घरी पाठविण्यात आले, तर ६५ अर्भकांचा मृत्यू झाला. यामध्ये आदिवासी भागातील पेठ, सुरगाणा, हरसुल, जव्हार, मोखाडा, नगर जिल्हय़ातील राजूर, अकोले येथील काही प्रकरणांचा समावेश आहे.

बालमृत्यू ही शेवटची कडी आहे. या प्रश्नावर काम करण्यासाठी किशोरवयीन मुलींच्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. १४ ते १८ वयातील मुलींच्या आरोग्यावर लक्ष देणे आवश्यक आहे. त्यांच्यात असणारा रक्ताक्षय, हिमोग्लोबिन कमतरतेसह अन्य काही विकार यावर वेळीच उपचार झाले. तसेच गरोदरपणात मातेची योग्य ती काळजी घेतली गेली तर बालमृत्यू निश्चितच नियंत्रणात येईल.

– डॉ. अनंत पवार, निवासी वैद्यकीय अधिकारी, जिल्हा शासकीय रुग्णालय