पाण्यावरून संघर्ष टाळण्यासाठी उपाय

नाशिक : गतवर्षी मुबलक पावसामुळे गोदावरी खोऱ्यातील सर्वच धरणे तुडुंब भरलेली आहेत. जायकवाडी आणि माजलगाव धरणही त्यास अपवाद नाही. ही दोन्ही धरणे १०० टक्के भरून बरेचसे जादा पाणी लाभक्षेत्रात उपलब्ध झाले आहे. यामुळे जायकवाडीत धरणात सध्या असणारा जलसाठा पुढील वर्षांसाठी राखून ठेवावा, अशी मागणी पुढे आली आहे. पाण्यावरून नाशिक, नगर, मराठवाडय़ात नेहमीच वाद होतो. मुबलक पाणी असणाऱ्या काळात जायकवाडीतील पाण्याचा बेकायदेशीररीत्या वापर होऊ नये तसेच भविष्यातील वाद टाळण्यासाठी हा पर्याय सुचविला गेला आहे.

या संदर्भात आमदार देवयानी फरांदे यांनी जलसंपदामंत्री, गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाकडे निवेदन सादर केले आहे. समन्यायी पाणीवाटप तत्त्वानुसार याआधी नाशिक, नगरमधील धरणांमधून जायकवाडीसाठी पाणी सोडावे लागले आहे. पाण्यावरून नाशिक- नगर- मराठवाडय़ातील वाद सर्वश्रुत आहे. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण कायद्यातील तरतुदी गोदावरी उपखोऱ्यास लागू झाल्या आहेत. जायकवाडी धरणासाठी ‘कॅरी ओव्हर’ची तरतूद करण्यात आली आहे.  दोन वर्षांत जायकवाडी धरणातील पाण्याचा तसा वापर अधिकाऱ्यांनी केला. जायकवाडीतील पाण्याचा बेकायदेशीररीत्या वापर होऊ नये म्हणून जायकवाडी धरणातील पाणी पुढील वर्षांसाठी राखून ठेवण्याची आवश्यकता असल्याचे फरांदे यांनी निवेदनात म्हटले आहे. गेल्या वर्षीच्या पावसामुळे धरणात मुबलक जलसाठा आहे. पुढील वर्षांसाठी त्याचे नियोजन करता येईल. चालू वर्षांत पावसाचे चित्र काय असेल हे अस्पष्ट आहे. यामुळे सध्या जो मोठय़ा प्रमाणात साठा आहे, तो पुढील वर्षांसाठी राखून ठेवण्याचा उपाय फरांदे यांनी सुचविला. १५ ऑक्टोबर २०१९ मध्ये जायकवाडी धरण १०० टक्के भरले.

गोदावरी अभ्यास गटाचा अहवाल तसेच महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणातील दावा क्रमांक नऊ यातील कायदेशीर तरतुदींची जाणीव त्यांनी पत्राद्वारे संबंधित अधिकाऱ्यांना करून दिली.