नाशिक : निसर्ग चक्रीवादळाचा प्रवास नाशिकमार्गे होणार असल्याचे बुधवारी सकाळी स्पष्ट झाल्यानंतर आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणासह शासकीय यंत्रणांची एकच तारांबळ उडाली. चक्रीवादळ तोंडावर आल्यावर खुद्द पालकमंत्री छगन भुजबळ यांनी तातडीने आढावा घेतला. नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले गेले. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर प्राधिकरणाने जी तयारी केली, त्या आधारे यंत्रणा सज्ज असल्याचे सांगितले. अकस्मात ऐनवेळी नियोजन करतांना यंत्रणांना तारेवरची कसरत करावी लागली.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार निसर्ग चक्रीवादळाचा प्रवास इगतपुरी, नाशिक, धुळेमार्गे होणार असल्याचे निश्चित झाल्यानंतर आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणासह सर्वच कामाला लागले. पालकमंत्री भुजबळ यांनी आपत्ती व्यवस्थापन मदत-पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे, पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह आदींशी संपर्क ठेवून परिस्थितीचा आढावा घेतला. हवामान विभागाच्या अंदाजानुसार निसर्ग चक्रीवादळ जिल्ह्यात येण्याची शक्यता आहे. काही भागात नागरिकांना अतिवृष्टी, गारपीट, वादळाचा फटका बसू शकतो. त्यामुळे नागरिकांनी आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या सूचनांचे पालन करून सुरक्षिततेसाठी घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन भुजबळ यांनी केले. या काळात नागरिकांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे. या अनुषंगाने सकाळी प्राधिकरणाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्याचे काम हाती घेतले. अवघ्या काही तासात सामान्यांपर्यंत माहिती देण्यासाठी समाज माध्यमांचा वापर करावा लागला. पावसाच्या तोंडावर पूर स्थितीला तोंड देण्यासाठी प्राधिकरण आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करते. त्यात प्रत्येक यंत्रणेची जबाबदारी निश्चित केलेली असते. या आराखडय़ामुळे यंत्रणेची तयारी सूकर झाली.

पालकमंत्री, जिल्हाधिकारी सक्रिय

संभाव्य धोका लक्षात घेऊन झाडे कोसळल्यास महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग या यंत्रणांशी समन्वय साधण्यात आला. नागरिकांनी घरातच सुरक्षित रहावे, घराच्या बाहेर पडू नये. घर नादुरुस्त असल्यास किंवा पत्र्याचे असेल तर तात्काळ दुरुस्ती करावी आणि सुरक्षित स्थळी आवश्यक साधनसामग्री सोबत घेऊन स्थलांतरीत व्हावे, असे आवाहन पालकमंत्री भुजबळ आणि जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले. किनारपट्टी भागातील आणि नाशिकची स्थिती वेगळी आहे. एरवी पूरस्थितीत नागरिकांना सुरक्षित स्थळी नेले जाते. या वादळ्यात नेमके काय होणार आणि पूर्वतयारीला फारसा अवधी न मिळाल्याने आहे त्या स्थितीला तोंड देण्यासाठी यंत्रणा धडपड करत होत्या.