शहराचा वेगाने होणारा विकास, गावठाणचे बदलत जाणारे स्वरूप, वाढते शहरीकरण याचा विपरित परिणाम आधीच वन्य जीवांवर होत असताना त्यात दुष्काळाची भर पडली आहे. पाण्याच्या शोधार्थ पंचवटीतील बळी मंदिर परिसरात आलेले उदमांजर हे त्याचे उदाहरण. वन्यप्राण्यांविषयी जनसामान्यांमध्ये माहिती नसल्याने काहींनी या प्राण्याला त्रास देण्यात धन्यता मानली. या उदमांजराबरोबर काहिसा असाच प्रकार घडला. पक्षीप्रेमींच्या प्रयत्नामुळे त्याला अखेर जंगलात सोडण्यात आले.
बुधवारी मुंबई-आग्रा महामार्गावरील हनुमाननगरजवळील सूर्यवंशी मळा परिसरात आंब्याच्या झाडावर विचित्र प्राणी असल्याचे स्थानिक रहिवासी योगेश सोनवणे यांनी नेचर क्लब ऑफ नाशिक संस्थेला कळविले. संस्थेचे अध्यक्ष प्रा. आनंद बोरा घटनास्थळी पोहचले असता झाडावरील तो प्राणी उदमांजर असल्याचे लक्षात आले. परंतु, दरम्यानच्या काळात त्या प्राण्याला हुसकावण्यासाठी नागरिकांनी दगड मारले. काहींनी त्याच्या बाजुला उभे राहत सेल्फी काढण्याचा प्रयत्न केला. आंब्याच्या झाडाखाली असलेल्या जलसाठय़ामुळे तो रात्री पाणी पिण्यासाठी येथे आला. मात्र उजाडण्याच्या आत बाहेर पडण्याआधी मानवी चाहुल लागल्याने तो झाडावर अडकला. त्याची अगतिकता पाहत वन विभागाच्या हवाली त्यास सुपूर्द करण्याचा प्रयत्न प्रा. बोरा आणि परिसरातील सुजाण नागरिकांनी केला. वन विभागाच्या अधिकाऱ्यांचा विचित्र अनुभव आला. वनपाल सुभाष गोसावी यांना दुरध्वनी केला असता, त्यांनी नागरिकांमध्ये प्राण्याविषयी जनजागृती करणे दूरच, पण आम्हाला झाडावर चढण्यात अडचणी येतात. तुम्ही त्याला झाडावर बसू द्या तो काही करणार नाही असे सांगत काम टाळण्याचा प्रयत्न केला. ही बाब उप वनसंरक्षक पी. पी. भामरे यांना कळवली असता त्यांनी गांभीर्य ओळखून लागलीच वनरक्षक इंदे यांना घटनास्थळी पाठविले.
त्यानंतर या उदमांजराला पकडण्यात आले. ते केवळ आठ-नऊ महिन्यांचे आहे. अवघ्या काही मिनिटात त्याला पुन्हा जंगलात सोडण्यात आले. पाणी टंचाईमुळे पुढील काळात वन्य प्राणी शहराकडे येण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पाश्र्वभूमीवर, वन विभागाने काही ठोस पाऊले उचलणे गरजेचे आहे. वन विभागाचा असाच निष्काळजीपणा कायम राहिला तर वरिष्ठ अधिकाऱ्यांना घेराव घालून जाब विचारला जाईल असा इशारा योगेश सोनवणे यांनी दिला.

पाण्याची व्यवस्था करणे गरजेचे
पंचवटीसह शहर परिसरातील काही भागात आधी जंगल परिसर होता. त्यामुळे वन्यजीवांचा वावर होता. झाडे तोडून या ठिकाणी मोठय़ा इमारती उभ्या राहिल्याने वन्यजीवांना आसरा नाही. त्यामुळे त्यांना कधी आसरा मिळवण्यासाठी तर कधी पिण्याच्या पाण्यासाठी शहराकडे यावे लागत आहे. पुढील काळात पाणी टंचाई कायम राहणार आहे. वन विभागाने ठिकठिकाणी जनावरांसाठी पाण्याची व्यवस्था करणे गरजेचे आहे.
– प्रा. आनंद बोरा, नेचर क्लब ऑफ नाशिक

वन विभागाचा असाच निष्काळजीपणा कायम राहिला तर वरिष्ठ अधिकाऱ्यांना घेराव घालून जाब विचारला जाईल
– योगेश सोनवणे, स्थानिक रहिवासी