पन्नासहून अधिक परिचारिका करोनाबाधित, विलगीकरणाचा कालावधीही कमी 

चारुशीला कुलकर्णी, लोकसत्ता

नाशिक : करोनाशी दोन हात करताना योद्धा म्हणून गौरविण्यात आलेल्या परिचारिका, चतुर्थश्रेणी कामगार यांच्यावर कौतुकाचा वर्षांव झाला; परंतु आठ महिन्यांनंतरही या योद्ध्यांना आपल्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी संघर्ष करावा लागत

आहे. करोनाग्रस्त रुग्णांची सेवा करताना ५० हून अधिक परिचारिका बाधित झाल्या. ज्या परिचारिकांना करोनाची बाधा झाली त्यांच्या विलगीकरणाची वेगळी व्यवस्था करण्यात आलेली नाही. तसेच त्यांच्यासाठी असणारा विलगीकरणाचा कालावधी कमी झाला आहे.

मार्च महिन्यात करोनाचा जिल्ह्य़ात शिरकाव झाला. तत्पूर्वी सरकारी तसेच खासगी रुग्णालयांमध्ये करोनाविषयक आजाराची माहिती देण्यात आली होती. करोना विषाणूचा संसर्ग कसा रोखता येईल, करोनाग्रस्त रुग्ण आढळल्यास सुश्रूषा करताना काय काळजी घ्यावी, त्यासाठी आवश्यक सामग्री याबाबत सरकारी तसेच खासगी रुग्णालयांत माहिती देताना चतुर्थश्रेणी कर्मचारी या प्रशिक्षणापासून कोसो दूर राहिल्याने करोना संसर्ग काळात या घटकांकडून काही ठिकाणी करोनाचा संसर्ग वाढण्यास मदत झाली. खासगी रुग्णालयांत करोनामुळे येणारा ताण पाहता परिचारिकांचे कामाचे तास वाढविण्यात आले. आर्थिक मंदीचे कारण देत त्यांच्या पगारात कपात करत व्यवस्थापनाकडून दबाव तंत्राचा वापर करत रजा रद्द करण्यात आल्या. काहींना कामावरून काढण्याची धमकी देण्यात आली. सरकारी रुग्णालयांत तर परिचारिकांना वेगवेगळ्या अडचणींना तोंड द्यावे लागले.

सुरुवातीच्या काळात संरक्षित साहित्य पुरेशा प्रमाणात देण्यात आले नाही. ज्यांना ते साहित्य मिळाले त्याचा दर्जा निकृष्ट राहिला. परिणामी परिचारिकांना त्वचेचे आजार झाले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, करोना कक्षात काम करणाऱ्या परिचारिकांना जेवणासाठी दोन ते तीन वेळा आंदोलने करावी लागली. याच काळात कक्षात काम करणाऱ्या परिचारिकांना विलगीकरणासाठी सुरुवातीला जिल्हा रुग्णालय किं वा सरकारी रुग्णालयात व्यवस्था करण्यात आली. परंतु करोनाग्रस्त रुग्णांची वाढती संख्या पाहता त्यांना घरीच विलगीकरणात राहण्यास सांगण्यात आले. सुरुवातीला १४ दिवसांचा असणारा कालावधी सद्य:स्थितीत दोन दिवसांवर आला आहे. अशा वेगवेगळ्या अडचणींना तोंड देत परिचारिकांचे काम सुरू आहे. खासगी रुग्णालयांत करोनाचा संसर्ग झालेल्या परिचारकांवरील उपचाराचा खर्च त्यांच्यावरच लादण्यात आला.

जिल्ह्य़ात रिक्त पदे अधिक

जिल्ह्य़ात रिक्त पदांची संख्या जास्त आहे. वास्तविक सामान्य कक्षात एका परिचारिके ला सहा रुग्णांचा सांभाळ करणे आवश्यक असते. परंतु वेगवेगळ्या सत्रात एक परिचारिका १०० हून अधिक रुग्णांना सांभाळत आहे. कं त्राटी कर्मचाऱ्यांची भरती होत असली तरी त्यांना करोनाकाळातील आवश्यक भत्ते, सुविधा मिळत नसल्याने काही जण काम सोडून जात आहेत. संरक्षित साहित्याविषयी तक्रोर के ली तर ते बदलून देण्यात येते. मात्र विलगीकरण घरीच करण्याचा पर्याय दिला आहे. सद्य:स्थितीत ५० हून अधिक परिचारिकांना करोनाचा विळखा पडला असताना यामुळे कु टुंबातील अन्य सदस्यांनाही त्रास होत आहे.

– कल्पना पवार (सरचिटणीस, नाशिक जिल्हा नर्सेस असोसिएशन)